यशवंत म्हणाला, “पण अजून आम्ही जागें होत नाही.”
नामदेव म्हणाला, “होय एक दिवस होऊं आपण धडपड करीत राहू. आपण सारी धडपड करणारी मुलें!”
गोपाळराव
एक हात भू नांगरणे
शत व्याख्यानांहून थोर
एक वार खादी विणणें
शत चर्चांपेक्षा थोर
संडास झाडणें एक
तव पांडित्याहून थोर
शेतकरी, तसे विणकरी, तसे रंगारी बना देशाचे
आळशी न कुणी कामाचे, यापुढे.
गोपाळराव म्हणजे एक गूढ व्यक्ति होते. त्यांच्या जीवनांत अनेक गुंतागुंती होत्या. त्यांच्या हृदयाचा थांग लागणें कठीण. ते अत्यंत निर्भीड व स्पष्टवक्ते होते. कर्तव्याची त्यांना फार कदर. व्यवस्थितपणा व हिशेबीपणा त्यांच्याजवळच शिकावा. लहानपणीं अगदी गरिबींतून ते वर आले होते. शिक्षा मागून, भार लावून ते शिकणे होते. कॉलेजमध्ये त्यांनी शिष्यवृत्या वगैरे मिळविल्या होत्या. ते दक्षिणाफेलो होते. एके काळीं प्रोफेसरहि होते. गणित व शास्त्र हे त्यांचे आवडते विषय. परंतु अर्थशास्त्राचाहि त्यांनी चांगला अभ्यास केला होता. संस्कृत सुभाषितेंहि त्यांना कितीतरी पाठ येत. रघुवंशांतील श्लोक कधींकधी ते म्हणून दाखवीत. त्यांची स्मृति असाधारण होती. त्यांची बुद्धि कुशाग्र होती.
मिशनरी लोकांचा त्याग पाहून गोपाळरावांना स्फूर्ति मिळाली होती. प्रोफेसरी त्यांनी सोडून दिली व निरनिराळ्या राष्ट्रीय शाळांतून त्यांनी काम केलें. एखादे काम हाती घेतले म्हणजे त्यांत तनमनधनेंकरून ते पडत. परंतु महाराष्ट्रांतील बहुतेक राष्ट्रीय शाळा मेल्या, मरणपंथास लागल्या. गोपाळरावांची प्रखर निराशा झाली. त्या वेळेपासून ते एकप्रकारें बाह्यात्कारी नास्तिक झाले होते. जगांत काही एक चांगले नाही. सारा किड्यांचा बाजार आहे असें त्यांना वाटे. परंतु स्वत: निराशा असले तरी निराशावाल्यास ते आशावंत करीत. त्यांना स्वत:ला कशांतहि अर्थ वाटत नसला तरी दुस-याला जीवनांतील अर्थ व दाखवू पाहात.
शिक्षणाचें त्यांना वेड होतें. शिक्षणानेंच राष्ट्राचा उद्वार होईल, शिक्षणानेंच नवविचार तरुणांत फैलावता येतील असें त्यांना वाटे. परंतु आजचें भारतीय शिक्षण दगडांच्या हातात आहे. भावनाहीन, स्वाभिमानशून्य लोक शाळांतून, कॉलेजांतून शिकवीत आहेत. ज्यांना ध्येयाचें दर्शन नाहीं, ज्ञानाबद्दल नितांत निष्ठा नाही असले पोषाखी किड आचार्य होता आहेत व मुलांना किड्यांप्रमाणे बनवीत आहेत.
परंतु रूप कसें बदलावयाचे? राष्ट्रीय शाळा काढल्या तर मुलें येत नाहीत. अराष्ट्रीय शाळांत गेले तर देश शब्द उच्चारावयासहि बंदी! आपापल्या ध्येयाना उपाशी धरून जगांत जें करता येईल तें करीत राहिलें पाहिजे असें गोपाळरावांस वाटे. अमळनेरला येऊन तें करीत राहिले पाहिजे असें गोपाळरावांस वाटे. अमळनेरला येऊन त्यांनी एक स्वतंत्र छात्रालय काढलें. गोपाळरावांच्या प्रयत्नांमुळे तें छात्रालय सर्वत्र नावाजले. नोकरीमुळे महाराष्ट्राच्या बाहेर असलेले पालक आपलीं मुलें या छात्रालयांत ठेवीत. गोपाळराव मुलांची अत्यंत काळजी घेत.