“पाहा, माझ्या हृदयांतील आईभोवती जमलेलीं मुलें पाहा,” असें ते पुन्हां म्हणाले व ते हात जणुं हृदयांत घुसवू लागले. ते दोघे तरुण रडू लागले. त्या तिघांच्या अश्रूंत नवभारताचा जन्म होता, नवखानदेशचा जन्म होता. त्या तिघांच्या अश्रूंतून कर्तव्याचें व सेवेचें कमळपुष्प फुलावयाचे होतें.
इतक्यांत गोपाळराव आले. ते म्हणाले. “ रघुनाथ, नामदेव, तुम्ही आता जा. तुम्ही निजा. तुमच्या परीक्षा आहेत. जा हो.”
परंतु स्वमीजीच त्यांना म्हणाले, “ रघुनाथ, नामदेव, तुम्ही जा. एकसारखें तुम्हीच श्रमणें योग्य नाही. आपणांस सहकार्य शिकावयाचें आहे. तुम्ही जा दुसरी दोन मुलें येऊन बसतील.”
नामदेव व रघुनाथ जड अंत:करणाने निघून गेले. हातांत हात घालून ते गेले. छात्रालयाच्या गच्चीवर ते गेले व त्या दोघांनी एकदम एकमेकांस मिठी मारली. परस्परांस मिठी मारुन ते रडले. ते एकमेकांच्या हृदयांतील विचार एकमेकांस देत होते का? ते भावी सेवेचा निश्चय करीत होते का? ते भावी सेवेचा संकल्प आकशांतील अनंत ता-यांना साक्षी ठेवून त्या अश्रुजलानें ते सोडीत होते का? त्या त्यांच्या मीलनांत भविष्यकाळाचें बीज होतें. भावी मनोरंथांच्या लहान लहान कळ्या जन्मल्या होत्या. ते दोघे आपापल्या खोलींत गेले व वाचीत बसले.
रघुनाथ रोज दैनिक लिही. स्वामीचीं परंपरा तो पुढे चालवीत होता. परंपरा चालविणें कठीण आहे. इंग्लंडमध्ये चारशें-चारशें वर्षें चालत आलेल्या संस्था आहेत. आपल्याकडेहि आहेत. परंतु त्यांत तेज नाही. शंकराचार्यांची यादी अकराशें वर्षे चालू आहे. परंतु हे गादीबहादूर शंकराचार्य समाजाची सेवा करतील तर शपथ! जगांतील ज्ञान किंवा अद्वैतज्ञान अनुभवतील तर शपथ! समर्थांची गादी चालली आहे. परंतु ज्या समर्थांनी स्वराज्याला पूजिलें, त्यांच्याच गादीवरचे महाराज काय दिवे लावीत आहेत? नामदार गोखले यांची परंपरा कितीशी पुढें चालली! करबंदीची चळवळ सुद्धा न्याय आहे असे नामदार गोखले. १९०५ मध्येंच म्हणाले होते. हिंदुस्थानांतील आयाबहिणींवर लाठीमार होत असतां. त्या गोखल्यांनी काय केलें असतें.? लोकमान्य टिळकांनी राष्ट्र त्यागाने तळपत आहे असें पाहून काय केलें असतें? परंतु अनुयायी जे वसतात, ते आपल्या गुरुच्या ध्येयाची वाढ करीत नाहीत. भारतसेवकसमाजानें नामदार गोखल्यांना ४९ वर्षांचेंच ठेवलें आहे. एक हजार लोक द्या, मी बंड पुकारतो असें म्हणणा-या लोकमान्यांना लोकशाही पक्षाच्या क्षुद्र पोतडींत त्यांच्या अनुयायांनी डांबून ठेविलें आहे.
स्वामीजी अशा गोष्टी मुलांजवळ नेहमी बोलत असत. रघुनाथानें ते शब्द लक्ष्यांत ठेवले होते. रघुनाथ सुंदर लिही. नामदेव, मुकुंदा त्याला मदत करीत. भावी संपादकाची तालीम रघुनाथ घेत होता. स्वामींच्या प्रकृतीबद्दल यशवंताचें आलेलें पत्र दैनिकांत आलें होतें. तें स्वामींना वाचून दाखविण्यांत आलें. दैनिकांतील आवेश, सरलता व सहृदयता पाहून स्वामींस परामानंद होई.
स्वामींच्या दुखण्याचा पाय मागें पडेना. ते आतां वातांतच राहात. ‘ती पहा हरिजनांची मुलें. ये हरणे ये. तुला गाणें शिकवतो. अस्पृश्यांच्या मुली. देवता आहेत त्या,’ असें बडब़डत मध्येंच एकदम उठून म्हणत, ‘चला आपण आश्रम काढूं, वर्तमानपत्र काढू. नामदेव, चाललास कुठे? वडील बोलावतात? बोलावू दे. भारतमाता बोलावीत आहे. तोड घरचे बं. काय, योत नाहीस? तुला खेचून नेईन.’ असेंच सारखें चाले. त्यांना दोघेचौघे धरून ठेवीत.
ते शब्द ऐकताना एखादे वेळेस नामदेव जवळ असे. नामदेवांचें हृदय खालींवर येई. ‘आपले वडील आपणास अडथळा करतील, हें का स्वामींना दिसत आहे? किती बरोबर त्यांनी ओळखलें. बंधन तोडून टाक! स्वामी, कसें तोडवेल हे बंधन? ज्या पित्यानें बाळपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढविले, त्यांचा प्रेमबंध कसा ती तोडू? कोठून येईल या दुबळ्या नामदेवाला तें धैर्य?
एखादे वेळेस हातांची बोटें विचित्र रीतीनें स्वामी फिरवीत असत. भिंतीवर बोटांची सावली पडे – तीच धरीत, पकडीत मध्येच हसंत व मध्येच रडत!
दुपारच्या वेळी गोदूताई शुश्रूषा करीत. मोसंब्यांच्या रस, अदमुरें ताक, सारें त्या मनापासून करीत. नामदेव स्वामीचें कपडे धुई, त्यांच्या अंथरुणावरची चादर वगैरे तो बदली. हलक्या हातानें त्यांच्या अंगांतील काढी व नवे घाली. स्पंजानें नामदेव व रघुनाथ कधी कधीं स्वामीचें अंग धुऊन काढीत. सेवा चालली होती.