“परंतु आमच्याजवळ पाटी नाही, पेन्सिल नाही; पुस्तक नाहीं, वही नाही,” मुलें म्हणालीं.
“त्याची मी व्यवस्था करीन,” स्वामी म्हणाले.
“येथे देवळांतच बसत जाऊ” मुलें म्हणाली.
“होय, देवाच्या पायांजवळ बसून शिकू,” स्वामी म्हणाले.
गोपाळरावांजवळून स्वामींनी एक फळा मागून घेतला. चित्रांची पुस्तकें, काही पाट्या, पेन्सिली, खडू-सामान तयार झालें. स्वामीजींची राष्ट्रीय हरिजनशाळा सुरु झाली. रविवारी हरिजनवस्तीतं सर्वत्र सफाई करावयाची असें ठरविण्यांत आलें. स्वामी मुलांना गाणीं सांगत व नाचत. आजूबाजूला बायकांमाणसें हें नृत्यगायन पाहावयास व ऐकावयास जमत! स्वामीजी लहान लहान गोष्टी सांगत. त्या मुलांना फारच आवडत. भारत, भागवत, रामायणांतील गोष्टी; बुद्ध, महावीर यांच्या चरित्रातील गोष्टी; अशोक, अकबर, प्रताप, शिवाजी यांच्या गोष्टी; महात्माजी, श्रद्धानंद, देशबंधू, लोकमान्य यांच्या गोष्टी; ज्योतिबा फुले, शाहू छत्रपति, डॉ. आंबेडकर, गुरुवर्य महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कथा-सारें सांगत. मुलें हा गोष्टीरूप इतिहास ऐकताना तन्मय होत असत. कधीं कधीं देशभक्तांची चित्रें आणून मुलांना स्वामी देत. कवीं स्वामी मुलांना बरोबर घेऊन नदीवर जात. तेथे त्यांना ते साबण देत. कपडे स्वच्छ होत. मुलें एकमेकांना पाठी चोळीत! सारे स्वच्छ होत.
स्वामीजी रात्रीं जात तेव्हा वर्तमानपत्रे वांचून दाखवीत. प्राचीन काळापासून अस्पृश्याद्वाराची चळवळ संतांनी कशी चालवीत आणली आहे. तें ते सांगत. सर्वांना ज्ञान मिळावें म्हणून संतांनी संस्कृत पंडितांच्याविरुद्ध सर्व हिंदुस्थानभर बंड कसें केलें त्याची हकीगत ते भावनोत्कटतेनें वर्णीत. तोच लढा महात्माजीहि पुढे चालवीत आहेत, आणि तुम्हीहि आतां जागृत झाले आहात, प्रश्न लौकर सुटेंल अशी आशा ते देत.
कधीं कधीं स्वामी नामदेवाला बरोबर घेऊन जात. नामदेव बांसरी वाजवी, सुंदर गाणीं म्हणे. फळ्यावर चित्रें काढून दाखवी. नामदेव अर्थातच दिवसां येणें शक्य नव्हतें. तो रात्री कधीं कधी येत असे. त्याची व हरिजनबंधूंची तेव्हांच मैत्री जमली.
या निरनिराळ्या श्रमांमुळें स्वामीना थकवा आला. श्रमामुळें थकवा आला कीं मनांतील निराशा थकवा देत असत. --- अपार दु:ख पाहून ते हळहळत. या आकाशाला कोण ठिगळ लावणार होतें त्यांतून त्यांना वाटे. ते बाहेरून खूप आशा दाखवीतं, परंतु अंतरी पुष्कळदा खिन्नच असत. निराशेचा भुगा त्यांच्या जीवनास रात्रदिवस पोखरीत होता.
त्याला एक निमित्त कारणहि झालें. छात्रालयांत यशवंत म्हणून जो मुलगा होता त्याच्याबद्दल स्वामींना खूप आशा वाटे. यशवंताच्या जीवनांत जमीनअस्मानाचा फरक झाला होता. छात्रालयांत कोणी आजारी पडला तर तेथें यशवंत सेवेला आधी हजर असें. स्वच्छेतेचे काम असो, कष्टाचें काम असो, स्वयंसेवक व्हावयाचे असो – यशवंताचा पहिला नंबर. खादीशिवाय तो आतां कांही वापरीत नसे. खादीफेरीमध्येहि सामील व्हावयाचा तो सर्वांत मिळून मिसळून वागे हंसतमुख राही. निर्मळ असे यशवंताला जरा बुद्धि कमी होती. त्याला गणित वगैरे समजत नसे. स्वामी त्याला म्हणत, “यशवंत, तू घऱचा सुखी आहेस. परीक्षा हें तुझें ध्येय नाही. तू खूप वाच. विचार करावयास शीक. नवीन दृष्टी घे. खोटे अभिमान सोड. मी तुझ्याबरोबर निरनिराळीं पुस्तकें वाचीत जाईन”
स्वामीनी यशवंताबरोबर खरोखरच पुष्कळ वाचला. यशवंत दैनिकांत लेख लिही. इंग्रजी लेखांचे भाषांतर करी. यंग इंडिया, मॉडर्न रिव्ह्यू जन्मभूमि, त्रिवेणी-सुंदर पत्रे, मासिकें स्वामी त्याच्याबरोबर वाचीत.
एक दिवस स्वामी म्हाले, “यशवंत! तू हिंदूस्थानभर प्रवास कर विश्वभारतींत एक ग्रामसंजीवन अभ्यासक्रम वर्षांचा असतो. तेथें एक वर्षंभर राहा. मोठे लोक पाहाशील, दृष्टी विशाल होईल. संतांची दर्शने होतील. साबरमतीच्या आश्रमांतहि असाच एक वर्षभर राहा. असा सर्व ठिकाणचा रस पिऊन पुष्ट होऊन ये. खानदेशच्या सेवेसाठी सिद्ध होऊन ये.”