वेणूला वाटले निजावे. बाहेर गार वारा सुटला होता. पाऊस पडू लागणार होता. हवेत गारठा आला होता. वेणू पांघयला पाहू लागली. सापडली एक वळकटी ! तिने उघडली. आत हाताला मऊशी शाल लागली ! हे भाऊचे नाही आंथरूण ! हे त्यांचे. होय त्यांचे. माझा हात हातात घेणा-यांचे ! निजू दे येथेच. वेणू निजली. ती शाल तिने पांघरली ! सारे अंग तिने गुरंगटून घेतले. वेणू सुखावली होती, मंदावली होती, आळसावली होती! नीज. तुला जाग्रण आहे. नीज, वेणू नीज!
तिला झोप येईना. काहीतरी चावू लागले. आंथरूणात चावू लागले. ढेकूण, पिसवा! वेणू उठली. किती चावते तरी ! तिला ढेकूण दिसत नव्हते. पिसवा दिसत नव्हत्या. परंतू चावत होते खरे. तिने ती वळकंटी निट गुंडाळून ठेवली. शालीची टोके बाहेर नाही ना आली, ते तिने नीट पाहिले. उठले तरी चावतेच आहे काही तरी ! दार उघडू दे. वेणूने दार उघडले. जोराचा वारा आत घुसला. देवाघरचा वारा. वा-याबरोबर पावसाचे थेंब आले. देवाच्या कृपेचे थेंब ! जोराचाच पाऊस आला. वेणूने दार बंद केले नाही. ! बाहेर पाण्याचे खळखळाट प्रवाह वाहत होते. वेणू शांत खिन्नतेने तेथे बसली होती. तिच्या डोळ्यांतून दोन थेंब गालावर घळघळले. ते थेंब कसले होते ? ते थेंब सुखाचे होते का दुखा:चे ? आशेचे की निराशेचे? पापाचे का पश्चातापाचे ? अश्रुंची फार चिकित्सा करू नये. दवबिंदूला फोडून पाहू नये. सारे विश्व त्यात असते.!
“वेणू ! दार उघडे काय ठेवलेस ? सारी खोली ओली झाली,” रघुनाथ येताच म्हणाला.
“खोलीतील घाण जाईल. खोली स्वच्छ होईल. येथे फार चावते. जरा पडले तर सारखे चावे. उघडे टाकले दार. होऊ दे स्वच्छ. खोली धुऊन निघू दे,” वेणू म्हणाली.
“आम्ही सारेच धुऊन निघालो. पावसात सापडलो. छत्र्या असून निरुपयोगी झाल्या. वा-याची फारच जोराची झड,” नामदेव म्हणाला.
“भाऊ ! तुमच्या खोलीत काय काय रे आहे?’ वेणूने विचारले.
“काय असणार वेणे ? पुस्तके, वह्या, अंथरुणे, भांडी, एक टेबल, दोन खुर्च्या, दोन फोटो आहेत,” रघुनाथ म्हणाला.
“कोणाचे रे फोटो?” तिने विचारले.