“मला येईल का काढायला सूत?” तिनें विचारलें.

“तुला हात आहेत का?”

“हो,”

“मग येईल,” स्वामी म्हणाले.

“परंतु शिकवील कोण?” वेणूनें विचारले.

“रघुनाथ,” स्वामीनें सांगितलें.

“तुला येतें रे भाऊ?” वेणूनें पुसलें.

“हो.”

“मग मला रे काही नाही शिकवलेंस?” तिनें लडिवाळपणें विचारलें इतक्यांत गांवातील भिका, जानकू वगैरे मंडळी तेथे आली.

“या, असे बसा,” स्वामी त्यांना म्हणाले. नामदेवहि उठून बसला.

“तुम्हाला पाणा पाहिजे चूळ भरायला?” वेणूनें विचारलें.

“हो,” नामदेव म्हणाला.

“बोलले, बोलले,” वेणू टाळ्या वाजवीत म्हणाली.

“हा माझा मित्र भिका आणि हे जानकूभाऊ जानकूभाऊ व भिका यांनी गांधीजयंतीला हा गांव झाडला. लोकांनी त्यांना नांवे ठेवली,” रघुनाथ सांगत होता.

“लोकांनी कां नांवे ठेवली?” स्वामीनीं विचारले.

“ते म्हणत तुम्ही का झाडू आहात, भंगी आहां? कोणी सांगितल्या या उठाठेवी? मीं म्हटलें आम्हाला महात्मा गांधी सांगतात. आम्ही गांव सफा करणार. घाण काढणार, लोक हसंत होते. आम्हाला वेडे म्हणत होते,” जानकू म्हणाला.

“जे आज वेडे समजले जातात, तेच उद्या वंदनीय होतात. दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून तमच्यासारखी माणसें निगू लागलीं हे केवढे भाग्य!

वा-याबरोबर बीं पाठवून जंगलेच्या जगलें परमेश्वर निर्माण करतो. माणूस एखादें झाड लावतो; त्याचाहि त्याला कोण अंहकार! आणि तें झाडहि जगेल का मरेल, झडेल का फुलेलफळेल याचा भरंवसा नसतो. महात्माजींच्या सेवेचा संदेश वा-याबरोबर दशदिशांत जात आहे, हृदयाहृदयांत पेरला जात आहे,” स्वामी म्हणाले.

“देवपूर गांवात कांहीतरी करावे असें मला वाटतें. मला विणकाम शिकून यायचें आहे. भिकाच्याहि मनांत आहे. आम्ही मग आमच्या गांवांत माग लावू, खांदी काढू,” जानकू म्हणाला.

“वा जानकू छान. तुमच्या घरीं कोण आहे?” स्वामीनी विचारलें.

“मी एकटा आहे. बायको मागेंच मेली. मी मजुरी करीत असतो,” जानकू म्हणाला.

“कोठें जाल शिकायला?” स्वामीनीं विचारलें.

“कापडणें, मुकटी जवळच आहेत. तेथें जाऊ परंतु खर्च हवा ना द्यायला? जानकू म्हणाला.

“किती खर्च येईल?” स्वामीनीं विचारलें.

“दोघांना दर महिन्यांला कमीतकमी पंधरा रुपये तरी खर्च येईल. सहा महिनें तरी राहिलें पाहिजे. जवळ जवळ शंभर रुपये हवेत. आमच्या मनांत इच्छा खूप आहे. परंतु काय करावयाचे?” जानकू म्हणाला.

“मी याचा विचार करीन. जमलें तर रघुनाथबरोबर. कळवीन नाहींतर मीच घेऊन जाईन,” स्वामी म्हणाले.

“आपला गांव चांगला करू,” रघुनाथ म्हणाला.

“तू शीक व आम्हांला येऊन मीळ. तू विचारांची पुंजी घेऊन ये. तोपर्यंत आम्ही येथे धडपडू. तू पुढे आलास म्हणजे शंका फेडशील आम्ही हातपाय व तू आमचें डोकें,” भिका म्हणाला.

“आणि हृदय रे?” वेणूनें विचारिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel