“या कळ्या फुलविण्यास पात्र मी आहे का? जो स्वत:चा प्रभु असेल त्यानेंच त्या देवराज्यांत शिरावे. परंतु ज्याच्या हृदयांत अजून सापविंचू आहेत त्याने जावें का? तो ते सापविंचू मुलांत सोडावयाचा. मुलें फुलावयाऐवजी मरावयाची. मुलांनी रागवू नये असें मला वाटत असेल, तर मी रागावतां कामा नये. मुलांनी रागवूं नये असें मला वाटत असेल, तर मी रागावतां कामा नये. मुलांनी आळशी राहू नये असे म्हणेन, तर आघीं मी सतत कर्मांत मग्न असलें पाहिजे. गोपाळराव कठीण आहे हे काम,” स्वामी म्हणाले.
“कठीण आहे म्हणूनच करण्यासारखें आहे. स्वत:च्याच जीवनाचा त्यांत खरा विकास आहे. आणि जगांत पूर्ण कोण आहे? सारे अपूर्णांकच आहेत. पूर्णांक झाली की परब्रह्मांत मिळाला. या देहांत पूर्णांक मावणार नाही. एखाद्या मडक्यांतील पाण्यांचे जर गोठून स्वच्छ बर्फ झालें, तर ते मंडकें फुटतें. पूर्ण ज्ञान या जीवनांत मावणार नाही,” गोपाळराव म्हणाले.
“मग जीवन्मुक्त म्हणजे कल्पनाच का?” स्वामींनी विचारलें.
“असें वाटतें. ज्याप्रमाणे भूमितीतील बिंदु काढता येणार नाही, रेषा काढता येणार नाही, तसेंच हें म्हणून भूमितींत ‘समजा’ हा शब्द आपण योजीत असतों. खरा बिंदु व्याख्येंतच राहातो, त्याप्रमाणे पूर्ण पुरुष ध्येयांतच राहाणार. त्या पूर्णत्वाच्या जवळजवळ गेलेले फार तर कांही लोक दृष्टीस पडतील. पूर्णत्व या शरिरांत भरतांच शरीर गळून पडेल.” गोपाळराव म्हणाले.
“ तुम्ही पुष्कळ विचार केलेला आहे. खोल दृष्टीने आहात तुम्ही,” स्वामी म्हणाले.
“परंतु तुमच्यातील भावनेची उत्कटता मजजवळ नाहीं. एक प्रकारची स्वभावांतील मधुरता माझ्याजवळ नाही. एका क्षणात ही दोन मुलें तुम्ही आपलीशी केलीत. ती देवाची देणगी असते. काल तुम्हाला पाहिल्यापासून मुलें तुमच्यासाठी वेडी झाली आहेत.” गोपाळराव म्हणाले.
“स्वामीजी! आतां चला. मुलें वाट पाहात असतील,” नामदेव म्हणाला.
“नाही तर आम्ही पुढें जातों. सा-या मुलांस आनंदाची वार्ता देतो.” रघुनाथ म्हणाला.
“खरेच, तुम्ही जा. सारी मुलें जमवून ठेवा,” गोपाळराव म्हणाले.
“आम्ही तुमचें सामान घेऊन जातो,” नामदेव म्हणाला.
“नामदेव! माझ्याजवळ दे घोंगडी. तू घे पिशवी प्रत्येकाजवळ काही तरी असू दे,” रघुनाथ म्हणाला.