“हवी का आणखी भाकर ? वाढू ?” आईने विचारलें.
“नको. भूक लागलीशी वाटते, परंतु खाववत तर नाही. भाकरीची नाहीं वाटते हो भूक ?” वेणूनें विचारलें.
“वेण्ये, दुसरें काय करायचें ? भाकर तरी पोटभर मिळूं दे म्हणजे झालें. भाकर तरी पोटभर सर्वांना कोठें मिळतें ?” आई म्हणाली.
“अग, तसें नाहीं काहीं मीं म्हटलें. म्हणजे खाण्याचीच भूक नाहीं. भूक तर वाटते, परंतु अन्न मात्र नको. दुसरी असते का ग भूक ?” वेणूनें विचारलें.
“मला नाहीं हो माहीत. मी का वाचतें ? तू उगीच वाचत बसतेस. वाचून वाचून वेडी होशील, नसत्या कल्पना मनांत आणशील. उद्यांपासून वाचू नकोस,” आई म्हणाली.
“वा ? मी वाचीन. तुला मदत करीन. पाणी आणीन. झाडीन. प्रभात फेरींत जाईन. प्रार्थना करीन. गाणें गाईन. कांतीन, पिंजीन. मी सारें करीन. म्हणजे मी भाऊला आवडेन, सर्वांना आवडेल,” वेणू म्हणाली.
आश्रमांत वेणू प्रार्थनेला गेली. तिनें कोणतें गाणें म्हटलें ? कोणती प्रार्थना म्हटली ?
भूकेले बघाया तुला दोन्हि डोळे ।। धृ० ।।
तुझें वेड मातें
तुझा ध्यास मातें
स्मृतीनेंच होतात हे नित्य ओले ।। भुकेले० ।।
वियोगें जळे मी
वियोगें गळे मी
वियोगामुळें फुल्ल हृत्पुष्प पोळे ।। भुकेले० ।।
तुला हे बघोत
तुला हे पिवोत
नसे हें जरी भाग्य होवोत गोळे ।। भुकेले० ।।