ते एकदम उठले. त्यांनी समाधीवर मस्तक ठेविलें. ते म्हणाले, “देवा! तुझे पाय व माझे डोके यांची तरी ताटातूट होऊ देऊं नको. माझ्या डोक्यांत नेहमीं तुझ्याच पायांचे स्मरण असू दे. आणि तुझा पाय म्हणजे काय?
‘पादोस्य विश्वा भूतानि ’
हे सर्व प्राणी म्हणजे तुझा पाय. तुझ्या पायांचें स्मरण करणें म्हणजे सर्व प्राणीमात्रांचें स्मरण करणें. मुसलमान, ख्रिस्ती, पारशी कोणीहि मला भेटो. तुझे पाय मला तेथे दिसू देत. महार, मांग, चांडाळ भेटो. तुझेच पाय तेथें मला दिसोत.
‘जेथें तेथें देखे तुझीच पाऊलें
सर्वत्र संचरलें तुझे रूप.”
असे मनांत म्हणता म्हणता स्वामी गहिंवरून गेले. केवढे उदात्त विचार! हिमालयांतील शुभ्र, स्वच्छ गौरीशंकर शिखराप्रमाणें हे विचार उच्च आहेत. भारताच्या उशाशी हिमालय आहे. भारताच्या डोक्यांत हेच थोर विचार सदैव घोळत आले आहेत. परंतु हिमालयांतील बर्फ वितळून खालच्या नद्यांना पूर येतात. खालची सारी भूमि समृद्ध होते. त्याप्रमाणें हे डोक्यांतील विचार खालीं संसारांत कधी येणार ? प्रत्यक्ष व्यवहारांत प्रेमाचे प्रवाह कधी वाहूं लागणार ? समाज सुखी व समृद्ध कधीं होणार ?
य़ा थोर विचारांचा अनुभव घ्यावयास भारत अजून कां उठत नाही? संतांची सारी संताने कां उठत नाहींत ? उठतील, उठतील जेथें हे विचार स्फुरले, तेथे एक दिवस ते मूर्तहि होतील. भारतीयांनो ! महान् कार्य तुमची वाट पाहात आहे. तुम्ही क्षुद्र गोष्टीत काय लोळत पडले आहेत?
सर्व जगाला, सर्व विचारांना मिठी मारावयास उठा. सारें बळ तुमचेंच आहे. सारी शक्ति तुमचीच आहे. आपली शक्ति दूर लोटून, तुम्ही पंगु व दुबळे होत आहात. तुम्ही अस्पृश्यांना दूर करता व स्वत:चे बळ कमी करता ब्राह्मण ब्राह्मणेतर एकमेकांस दूर करतात व आपलें सामर्थ्य कमी करून घेतात. अरे, आपापले हात पाय तोडता काय? तुम्ही कोट्यवधि शिरांचे व कोट्यवधि हातांचे आहांत. आपली डोकीं व आपले हात तुम्ही आपण होऊन काय छाटीत बसलात? केवढे तुमचें भाग्य. केवढे तुमचें सामर्थ्य ! अरे करंट्यांनो ! तें दूर नका फेंकू, दूर नका लोटूं.
चंद्राला पाहून समुद्रावर लाटा उसळतात. त्याप्रमाणे ध्येयचंद्र डोळ्यासमोर आल्यामुळे स्वामीजीचें हृदय शतविचारांच्या लाटांवर नाचत होतें. ती समाधि, तो सरित्प्रवाह, तेथील वाळवंट, त्या सर्व वस्तु एकच गोष्ट त्यांना सांगत होत्या. अनेक दगड एकत्र आले, संयमपूर्वक एकत्र आले व समाधि उभी राहिली. एकेक जलबिंदु प्रेमानें जवळ आला व नदी वाहू लागली. एकेक कण जवल आला व वाळवंट बनलें. स्वामींनी वर पाहिलें. एकेक वारा जवळ येऊन सारें आकाश फुललें होते. स्वामीनीं दूर पाहिले. एकेक मृत्कण जवळ येऊन ती दूर टेंकडी उभी होती. सजीव, निर्जीव सृष्टी एकत्वाचा संदेश सांगत होती.
शब्द एकत्र येतात, सारस्वतें बनतात. ‘फुलें एकत्र येतात व हार गुंफिले जातात. सूर एकत्र येतात व दिव्य संगीत निर्माण होतें. शेंकडों हाडें एकत्र येतात व हा देह बनतो. या देहांत केवढें सहकार्य, किती प्रेम ! पायाला कांटा बोचंला तर वरच्या डोळ्याला पाणी येतें ! या लहानशा देहांत सारा वेदांत भरलेला आहे. सारी शास्त्रे येथे ओतलेली आहेत. परंतु कोण पाहातो? आंधळे, सारे आंधळे !
समाधीच्या पाय-यावरुन स्वामी खालीं उतरले. नदीच्या पाण्यांत ते शिरले. त्यांच्या डोळ्यांतील भावगंगा खाली वाहत होती. ते खाली वांकले व म्हणाले, “ हे सरिते! तू सागराकडे जात आहेस. मानवजात ऐक्यसागराकडे कधी ग जाईल? सांग, सांग – हे जगन्माते सांग, सांग.”