गोपाळराव म्हणाले, “नाही तेथेंहि मला परिपूर्ण नि:स्वार्थता दिसत नाही, स्वार्थांचा वास प्रेमाला सहन होत नाही. जगांत स्वार्थाशिवाय तर जगता येत नाही. मूल म्हणजे पतीपत्नीच्या विषयचैष्टेची ती खण! इलाजच नाही म्हणून माता त्या मुलाला वाढवते.”
स्वामी संतापले, लाल झाले. ते रागानें म्हणाले, “काय, मातेच्या प्रेमाचीहि तुम्ही टवाळी करता? तुमची जीभ झडत कशी नाही?”
गोपाळराव म्हणाले, “मी सत्य सांगत आहे म्हणून झडत नाही, वाटलें तर तुम्ही या व प्रेमानें ती उपटून टाका.
स्वामी म्हणाले, “गोपाळराव! या जगात कशावरच तुमची श्रद्धा नाही का?”
गोपाळराव म्हणाले, “तसे खोल पाहिले तर खरोखरच कशावरहि माझी श्रद्धा नाही.”
स्वामी म्हणाले, “खोल पाहिलेत तर सर्वत्र श्रद्धाच तुम्हाला दिसेल श्रद्धेवर सारे विश्व चाललें आहे. महात्माजींना वाटतें माझ्या मार्गानें सुख येईल. साम्यवाद्यांना वाटतें आमच्या विचाराने सुख येईल. तोफवाल्यांना वाटतें तोफेनें तुफाने शांत होतील. जो तो आपली श्रद्धा धरून जात आहे. परंतु तें दूरचें जावो. ही हवा तुम्ही नाकाने आंत घेत आहात, ती विषारी नाही अशी तुमची श्रद्धा आहे. पायाखालची भूमि दुभंगणार नाही, आकाश वरून पडणार नाही अशी तुमची श्रद्धा आहे, मी तुमच्या डोक्यांत धोंडा मारणार नाही या श्रद्धेमुळेंच तुम्ही येथे बोलत आहात. तुमची पत्नी तुम्हाला जेवायला वाटते त्यांत विष नाही अशी तुमची श्रद्धा असते. आपण निजतो तर घर कोसळणार नाही अशी श्रद्धा तुमच्याजवळ असते.
“गोपाळराव! श्रद्धा आपल्या जीवनांत इतकी भऱलेली आहे म्हणूनच ती दिसत नाही. आपण श्वासोच्छवास करतों याची आपणास जाणीव थोडींच असतें! तसेंच श्रद्धेचे, श्रद्धेशिवाय श्वासोच्छ्वास नाही, श्रद्धेशिवाय पाऊस पडत नाही. श्रद्धा आहे म्हणून तुम्ही जगत आहात. श्रद्धा आहे म्हणून तुम्ही मला बोलावलेत. श्रद्धा आहे म्हणून छात्रालय चालविता. तुमच्या रोमरोमति श्रद्धा आहे. ज्या क्षणीं सारी श्रद्धा उडेल, त्या क्षणी जीवन नाहीसें होईल, जीवन गळून पडेल. श्रद्धेच्या सुक्ष्म परंतु बलवंत तंतूवर सार विश्व विसंबून आहे. श्रद्धा नाही असें जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचे तुम्हालाच आपण काय बोलतों हे समजत नसते.”
गोपाळराव म्हणाले, “तुम्ही कांहिहि म्हणा वादविवाद मला करावयाचा नाही.”
ज्या गोपाळरावांनी आशोपनिषद् आळवून स्वामीना प्रत्यक्ष सेवेच्या कामांत ओढून आणलें, ते गोपाळरावहि पुष्कळदा निराशेने बोलत. स्वामींना त्याचें आश्चर्य वाटे.
एके दिवशी गोपाळराव स्वामींना म्हणाले, “जगात एक गोष्ट सत्य आहे व ती म्हणजे मरण. शेवटी मूठभर राख- हे या जगाचें स्वरुप आहे. असले नालायक जग निर्माण करणा-या ईश्वराचा निषेध करुन मरावे असे मला वाटते. इंग्रज सरकारचा किंवा सनातन्यांचा निषेध करण्याऐवजी त्या परमेश्वराचाच निषेध केला पाहिजे. परंतु मरण्याचे धैर्य अजून मला होत नाही.”
स्वामी म्हणाले, “रोज मरेन, मरेन म्हणणारा भऱपूर जगणार यांत संशय नाही. मरणांचा शब्दहि उच्चारु नये असें आपण म्हणतों. परंतु ती शब्द पुन्हा पुन्हा उच्चारून त्या शब्दातील डर तुम्ही नाहीसा करीत आहा. मरण म्हणजे भाजीपाला, मीठमिरची असें तुम्ही करीत आहात तुम्हांला जीवन प्रिय आहे मरण नाही.”