एकें दिवशीं बोलतां बोलतां स्वामी म्हणालें, “नामदेव, मला माझ्या विकारांशी किती झगडावें लागलें आहे! हल्ली माझ्या तोंडावर जे हास्य असेतं ते मुलांना आवडतें. ‘स्वामी! तुम्ही कसें गोड हसता,’ असें लोक मला म्हणतात. परंतु ते हास्य लाभावें म्हणून मी किती रडलों आहे! एक फूल फुलावें म्हणून झाड रात्रदिवस धडपडत असतें. त्याची मुळें खाली भुगर्भात अंधारांत चांचपडत असतात! ओलावा शोधीत असतात. लोकांना ते गोड फुललेलं फुल दिसतें. परंतु वर्षानुवर्ष अविरत केलेली धडपड दिसत नाही! नामदेव! रामतीर्थांनी एके ठिकाणी लिहिलें आहे,’ पावित्र्य ही सर्वांत महत्त्वाची वस्तु होय! पावित्र्याचा कायदा पाळला गेलाच पाहिजे. ज्याला आपले विचार ताब्यांत घेता येत नाही, मरून जावें त्यानें!’ मला वाटे आपण मरावें, मी आगगाडीच्या रुळावर पडून राहावें. परंतु आगगाडीचा जवळजवळ आवाज आला की हे शरीर उठे! मी विहिरीच्या कांठी जात असे व डोकावत असे! परंतु उडी घेण्यात धीर होत नसे. जीवनाची आसवित कोठे सुटली होती? मी मरु इच्छित होतो; परंतु देव जगवूं पाहात होता. नामदेव, एक वाक्य लक्ष्यांत ठेव; आपले हृदय आपणास तुच्छ समजत असेल, परंतु देव नाही आपणांस तुच्छ समजत; आपण स्वत:च्या जीवनाला शिव्या देत असू, परंतु देव नाही त्याला शिव्या देत मी धडपडत होतो. आपण मनानें निर्मळ व स्वच्छ व्हावें यासाठी मी जितका रडलों आहे, तितका या महाराष्ट्रात कोण रडला असेल? अरे, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याजवळ अश्रु आहेत. आपण गरीब आहोंत, आपल्याला कोणी नाही, आपलें कोणी मेलें, आपला कोणी अपमान केला, आपणांस अपयश आलें, आपल्यावर टीका आली, आपण परिक्षेंत नापास झालो, तर आपण किती रडतो? या सर्व गोष्टीसांठी अश्रूचें हौद डोळ्यांजवळ भरलेले आहेत. परंतु आपण निर्मळ व स्वच्छ व्हावें म्हणून कोण रडतो? दुस-याचे अश्रु आपणास पुसता येत नाही या तळमळीने कोण रडतो, कोण धडपडतो? मी रात्रींचा रात्री आई, आई म्हणत असें. ‘ये, माझे घर झाडं, ये माझ्या घऱाचा कबजा घे. येथील सारे कामक्रोध घालव. माझे घर मी तुला लिहून देतो ये आई ये,’ असें मी म्हणत बसे. वारा सळसळला की वाटे तो आला. झाडाची पाने हालली की वाटें तो आला. नामदेव! अशी ही धुमश्चक्री चालावयाची. परंतु हळूहळू मन शांत होत चाललें. प्रसन्नता थोडीथोडी मिळत चालली! चंद्राची कोर एकदा उगवली म्हणजे ती वाढत जाईलच. एकदां ती कोर दिसू लागणें हेंच महत्त्वाचे असतें. विकारांच्या वादळांत माझ्या मनश्चंद्राची कोर कित्येक दिवस मला दिसत नव्हती! कित्येक वर्षे मला दिसत नव्हती! परंतु एकदां दिसली लहानशी! नामदेव ! भगवान् शंकराच्या डोक्यांतून निर्मळ विचारांची गंगा वाहाते व शीलाचा चंद्र तेथे मिरवत असतो! कारण संयमाचा तिसरा डोळा त्यांच्याजवळ असतो! अपवित्र भाव जवळ येऊं लागतांच संयमाचा प्रखर असा तृतीय नेत्र ते उघडतात व त्या विचारांचें भस्म करतात! आणि होळींतलें ते भस्म मग अंगाला लावतात! विलायती मालाची होळी करुन यशवंतानें त्या दिवशी ती राख कपाळाला लावली होती! परंतु दुसरी विलायती वस्त्रे आपल्याजवळ किती तरी आहेत? आत्म्याच्या मांगल्याला, दिव्यतेला, पावनत्वाला सत्यंशिवंसुंदरत्वाला न शोभणारी अशीं वासनाविकारांची विदेशी वस्त्रे आत्म्याच्या राजधानींत शिरत असतात! मन, बुद्धि, हृदय यांना बाटवीत असतात! ही कोण जाळतो, कोण फेंकतो?
“स्वत:शी कठोर व्हावें लागतें. द्या दुस-यांच्या दोषांसाठी व क्रोध स्वत:च्या दोषांसाठी आपणांजवळ आहे. नामदेव, प्रयत्न करावेत, धडपड करावी. धने असतात ना? ते पेरण्यापूर्वी चुरडावे लागतात! जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या रथाखाली जो चुरडला जाईल तो उद्वरला जाईल असें म्हणतात! हंसण्यापूर्वी रडावें लागतें, उठण्यासाठी पडावे लागतें. अमर अत्तर निघावें म्हणून फुलांना आधणांत उकळून घ्यावें लागतें. मातीचा पेला ओठांला लागतो, परंतु आधी त्याला आगींतून जावे लागतें. लाकडाचा तुकडा तुमचे सुंदर केंस विचरतो, परंतु तुमच्या डोक्यावर नाचता यावें म्हणून त्याला कर्वतून घ्यावें लागलें आहे! टोंचून घेतल्याशिवाय मुरांवळा नाही! भाजून दळून घेतल्याशिवाय पोळी नाही! जमिनींत गाडून घेतल्या शिवाय अंकुर नाही! गर्भवासांत राहिल्याशिवाय जन्म नाही! नामदेव सर्वत्र त्यागानें महत्त्व व विकास झाला आहे. कष्टानें तेज चढलें आहे. मोल वाढलें आहे असें तुम्हांस दिसेल.
“सेवा करीत, करीत निर्मळ होत जाऊ, ‘कर्मणा शुद्धि’ असे म्हणतात कर्मामुळें आपलें गुणदोष दिसतात. दुस-यांशी संबंद येईल तेव्हाचं आपली शांति सहनशीलता यांची कसोटी असते. सहनशीलता ही गुणांची कसोटी आहे. अंथरुण उन्हांत टाकिलें की, लपलेले ढेकूण बाहेर पडतात! त्याप्रमाणे हृदयांत दडलेले विकास संसारांत कर्मे करु लागलों म्हणजे प्रकट होतात. एकांतांतील शांतीची परीक्षा या जगांतील संसारांत येऊन घ्यावी लागते. सकाळ, सायंकाळ, प्रार्थना व दिवसा सेवा. प्रार्थनेचा प्रकाश घेऊन दिवस सुरु होऊ दें. प्रार्थनेचा प्रकाश घेऊन झोंपी जाऊ दे. प्रार्थनेचा प्रकाश सदैव आत्म्याभोंवती फिरत राहो.