निर्भय रघुनाथ पाण्यांत शिरला! त्याच्या पाठोपाठ मुकुंदा निघाला. पाण्याचें परीक्षण निरीक्षण होऊं लागलें. भीतभीत नामदेवहि निघाला. यशवंत नामदेव हात धरून चालले होते. स्वामीनीं वामनला उचलून घेतलें व पलीकडे नेलें. पुन्हां परत येऊन त्यांनी हरीला उचललें. रघुनाथ व मुकुंदा यांनीहिं परत येऊन कांही मुलांना हात धरून नेलें. सारीं मुलें बाहेर आलीं.
“एकमेकांच्या मदतीनें सारे तरलेत. तुम्ही मोठे झालेत म्हणजे असेंच एकमेकांना हात द्या व क्रांतीच्या प्रवाहांत यशस्वी व्हा. ये, वामन! तुला उचलूनच घेतो. तू आतां दमला आहेस. बस माझ्या खांद्यावर. नाहीं तर पाठंगुळीस तुला घेतों, म्हणजे थंडी वाजणार नाही,” असें म्हणून खरेंच वामनला त्यांनी उचलून घेतलें. मुलांनी टाळ्या पिटल्या. “वदें मातरम्, वंदे मातरम्” सारे म्हणाले.

नामदेव हरीला म्हणाला, “ये रे. तुला मी घेतों. चल ये.” हरि हंसत हंसत नामदेवाच्या खांद्यावर चढला!
मारुतीच्या खांद्यावर राम, अंगदाच्या खांद्यावर लक्ष्मण तसें तें दृश्य दिसत होते. पर्वताच्या माथ्यावर लहानसें हिरवेगार झाड असावे, किंवा एखादा आम्रवृक्षावर पोपट बसावा तसें तें दृश्य होतें!

“भराभर चला, म्हणजे थंडी वाजणार नाहीं. रेंगाळणा-याला सारें बाधते,” स्वामी म्हणाले.
मुलें धांवपळ करूं लागली. पाण्यानें सारी माती वाहून गेली होती व रस्त्यावरील स्वच्छ खडी पायांना टुपत होती. भराभरा-पळताना त्रास होत होता.

पुन्हां पाऊस आला जोराचा पाऊस आला. आता वारा नव्हता. कडाडू कडाडू नव्हते. विजांचा नाच नव्हता. सृष्टीची समाधि होती. विशाल आकाशाच्या समाधींतील ते धन्याश्रू होते. झाडें लवून गेलीं होती.

गुराखी गुरें घेऊन परतत होतें. गुरांच्या माना खाली झाल्या होत्या. पावसाची झड होती. आकाशाचें अंतरंग भरून आलें होतें. होऊं दे रितें. तें पाहा स्टेशन दिसू लागलें. आलें, अमळनेर आलें. मुलांच्या पायांत जोर आला. ध्येय दिसू लागतांच पाय लगट करूं लागले. आलीं सारीं मुलें छात्रालयांत आलीं. सर्वांनी अंगे कोरडी केलीं. केस नीट पुसलें. दुसरे धुतलेले स्वच्छ कपडे घातलें. इतक्यात गोपाळराव आले.

“तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. तुम्ही दरिद्रीनारायणाची यात्रा करून आलेत,” ते हंसत म्हणाले.
“आम्ही महादेवाचें दर्शन करुन आली,” नामदेव म्हणाला.
“मारवडला कोणता महादेव आहे?” गोपाळरवांनी विचारलें.

“प्रत्येक गांवाला महादेव आहे; पण महादेव कोठें आहे,” गोपाळराव पुन्हा म्हणाले.

“खेड्यांतील जनता म्हणजेच महादेव. दारि-द्यांत, विपत्तीच्या स्मशानांत पडलेला महादेव! भोळा भाबडा महादेव. थोड्याशा सेवेनें हृदय देणारा महादेव. परंतु उपेक्षेंची पराकाष्ठा झाली असतां रूद्र बनून सर्व जगाचा संहार करणारा महादेव! या महादेवांचें आम्ही दर्शन घेतले,” स्वामी म्हणाले.

गोपाळराव क्षणभर मुके होते.
“अरे तुमची हुडहुडी अजून जात नाही. दहादहा जोर तरी काढा,” गोपाळराव म्हणाले.
“खडे बोंचून पाय दुखत आहेत. व्यायाम भऱपूर झाला आहे,” रघुनाथ म्हणाला.

“एकेक कोयनेलची गोळा घ्या सारे. नामदेव! जा, घेऊन ये ती वळी तिच्यांतील एकेक गोळी सर्वांना दे,” गोपाळराव म्हणाले.
“आम्हांला खाऊ देण्याऐवजी कडूकडू गोळी देणार वाटते,” मुकुंदांने हंसत विचारिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel