ते पाहा कांहीं अध्यापक, कांहीं अचार्य, स्वामी व चिटणीस येत आहेत. स्वामींना पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांची ती उंच भव्य दिव्य मूर्ति पाहून मुलांना आनंद झाला. राष्ट्राच्या सर्व खुरटलेल्या संसारांत उंच कांहींतरी दिसणें किती आशादायी असतें, स्फूर्तिदायी असतें ! उंच मनुष्य, उंच मन, उंच विचार, उंच ध्येयें असें उच्चदर्शन एक प्रकारच्या उंच वातावरणांत घेऊन जातें.
स्वामींची ओळख करून देणार ? चिटणीसांनीं तें काम रघुनाथाकडे सोंपविलें. रघुनाथ उभा राहिला. काळासांवळा, तेजस्वी, किडकिडीत, उंच रघुनाथ उभा राहिला. रघुनाथ बोलू लागला.
“गुरुजन व विद्यार्थी बंधुभगिनींनो ! आजच्या वक्त्यांची ओळख मला करून द्यावयाची आहे. आजचे वक्ते सर्व हिंदूस्थानभर हिंडले आहेत. हिंदूस्थानांतील सजीव निर्जीव सृष्टी त्यांनी पाहिली आहे. वाळवंटे पाहिली आहेत, सुपीक गंगायमुनांच्या कांठचे प्रदेश पाहिले आहेत. पर्वतांतून हिंडले आहेत, मैदानांतून भटकले आहेत. त्यांनी अनेक संस्था पाहिल्या आहेत. अनेक ठिकाणीं कामहि केलें आहे. परंतु त्यांना समाधान झालें नाहीं. परिव्राजक असताना ते अमळनेर येथे आले. तेथील छात्रालयाच्या चालकांनी स्वामींना आपल्या संस्थेंत घेतलें व गेलीं तीन वर्षें ते तेथें आहेत. तेथील मुलांच्या मनावर सत्संस्कार करण्याचें काम रात्रंदिवस त्यांचे चाललेलें असतें. देशाची एकच चिंता त्यांना आहे. गरिबांचे दुःख पाहून ते झटतात. ते गांवें झाडतात, हरिजनांना शिकवितात, हरिजनांच्या आजारी मुलांची शुश्रूषा करतात. ते खादी विकतात, मुलांसाठी रोज हस्तलिखित दैनक लिहितात. ते नवजीवन देत आहेत. त्यांचे थोर हृदय, विशाल व व्यापक बुद्धि, त्यांची तळमळ, त्यांची सेवावृत्ति, त्यांचे अनंत प्रेम मी थोडक्या वेळांत किती सांगू ? अशा एका थोर विचारवंताचे, ध्येयदर्शी पुरुषाचे, सेवारताचे शब्द आपण शांत ऐकून घ्या असें सांगून मी आपली रजा घेतों.”
चिटणीस उभे राहिले. ते म्हणाले, “आजच्या सभेला अध्यक्ष नको. आजचे सन्मान्य वक्ते आतां आपलें भाषण सुरू करोत अशी सर्वांच्या वतीनें मी त्यांना विनंति करितों.”
स्वच्छ खादीच्या पोषाखांतील ती भव्य मूर्ती उभी राहिली.
“मित्रांनो ! तुम्हां सर्वांना पाहून मला अपार आनंद होत आहे. काळ्या-सावळ्या, सजल मेघांना पाहून मोराला आनंद होतो. तो आपला पिसारा पसरतो, नाचतो, तन्मय होतो. तसेंच तुम्हांला पाहून मला झालें आहे. तरुण म्हणजे ओल्या हृदयाचे, रसरसलेल्या भावनांचे, जिज्ञासू वृत्तीचे, बुभुक्षित बुद्धीचे जीव होत. ध्येयांना मिठी मारूं पाहाणारे, त्यागाला कवटाळू पाहाणारे, संसारांतील चिखलात अद्याप न बरबटलेले असे तुम्ही आहात. अनंत आकाश तुमच्यासमोर आहे, अपार भविष्य तुमच्यासमोर आहे. या अनंत आकाशांत कोठें उड्डाण करणार या अपार भविष्यांत काय करणार ? तुमच्या विचारांतून, तुमच्या स्वप्नांतून, तुमच्या ध्येयांतून उद्यांचा भारत सजला जाणार आहे. तुम्ही उद्यांचे जनक आहात, भविष्य काळाचे विधाते आहात. ही जबाबदारी तुम्हीं ओळखली पाहिजे. तुमच्या ओंठावर जीं गाणीं व जे शब्द खेळत असतील त्यांतून उद्यांचे पोवाडे, उद्यांची महाकाव्यें, उद्यांचें सारस्वत, उद्यांचा इतिहास निर्माण होणार आहे. एका रशियन ग्रंथकारानें म्हटलें आहे, ‘तरुण कोणतीं गाणीं म्हणतात तें सांगा म्हणजे त्यांच्या राष्ट्राचें भवितव्य मी सांगेन.’ मीहि तुमची गाणी विचारावयास आलों आहे. कोणती गाणीं तुम्ही तुमच्या ओंठावर खेळवता ?