“परंतु निरनिराळ्या जातीच्या पंक्ति अलगअलग तुम्ही का बसवीत नाही?” व्यापारी म्हणाला.
“तें जमणार नाही. मुलांना तुम्ही सांगितलेत तरी दोन दिवशी पुन्हा पूर्वीप्रमाणेंच होणार. मुलें युगधर्म ओळखतात. एखाद्याला खरुज झाली असली किंवा कांही रोग असला तर मात्र त्याला निराळे बसवतो. त्यंचे ताट, त्याचा पाट निराळा ठेवतो,” गोपाळराव म्हणाले.
“परंतु मुलें निरनिराळ्या पंक्तीला बसविली म्हणजे बरें. कोणाची मनें दुखविली जाणार नाही. सबगोलंकार करणें बरे नव्हे,” व्यापारी म्हणाले.
“हें पाहा, तुमची मनें दुखविली जाणार नाहीत; परंतु ज्यांना तुम्ही दूर ठेवाल त्यांची मनें दुखविली जातील. दूर ठेवण्यांत श्रेष्ठ, कनिष्ठपणाचीच मुळांत भावना आहे. आज सर्वांना स्वाभिमानाची जाणीव झालेली आहे. त्यांची मनें कां मी दुखवू? आणि हे पाहा शेटजी! सब्गोलंकार वास्तविक पाहिले तर तुम्ही सनातनीच करीत आहात. तुम्हीच सर्व जाती मीडीत आहात,” गोपाळराव म्हणाले.
“तें कसें काय? हें तर नवीनच ऐकतों,” व्यापारी म्हणाले.
“विचार न करणा-याला सारें नवीनच असतें. हें पाहा शेटजी, तुम्ही गिरणी काढलीत कापडाची, पारोळ्याचे विणकर मेले, पिंजारी मेले, कातारी मेले, लोढारी मेले. या सर्व जातीचे धंदे बुडाले व ते तुमच्या या राक्षसी कारखान्यात एके ठिकाणी मरत आहेत. तुम्ही घरांवर कुंभाराची कौलें घालीत नाही, विलायती पत्रे घालता; त्यामुळे कुंभार भिकेला लागला. तो तुमच्या मिलमध्ये आला. तुम्ही एक तेलाची गिरणी काढली आहे. त्यामुळें शेंकडो तेल्यांचे घाणे बंद झाले. ते तेली तुमच्या गिरणीत आले. तुम्ही लोखंडी घमेलीं वापरुं लागलेत. त्यामुळे बुरुड मेला व तुमच्या कारखान्यांत तो मरायला आला. तुमचे कारखाने सर्व जातीचे धंदे बुडवून त्यांना एकत्र आणीत आहेत. तुम्हाला विणकर जगावा अशी इच्छा असतो तर खादी वापरली असतील. तेली जगावा अशी इच्छा असती तर हातघाणीचें तेल घेतेत. कुंभार जगावा अशी इच्छा असती, तर कुंभाराची मडकी व कौलें घेतली असतीत. शेटजी! धर्म म्हणजे थट्टा नाही. धर्म म्हणजे त्याग आहे. आज महात्माजी एकप्रकारे जातीचें रक्षण करीत आहेत व तुम्ही जाती मारीत आहात. धर्म तुमच्यापेक्षा मला अधिक समजतो. तुम्हाला धर्माची चाड असती, तर आज वानप्रस्थ झाले असतेत व समाजाची सेवा करू लागले असतेत. तुमचें आतां वय झालें. परंतु आणखी कारखाने काढीतच आहात. सनातन धर्म नाव सोपें आहे. सनातन धर्म पाळणें म्हणजे सतीचें वाण आहे. एक महात्मा गांधी खरे सनातनी आहेत! बाकी सारे दांभिक बगळे आहेत झाले!”
शेटजी थंडगार झाले. ते मुकाट्यानें उठले व जाऊ लागले. दारापर्यंत गोपाळराव त्यांना पोंचवावयास गेलें. असें हे गोपाळराव होतें. स्वामीना प्रथम गोपाळरावाचा स्वभाव नीट समजेना. ते बुचकळ्यांत पडत. त्यांचे कडाक्याचि वाद होते. एके दिवशी गोपाळराव, स्वामी व इतर काही मित्र बसले होते. प्रेमासंबधीची चर्चा चालली होती.
स्वामी म्हणाले, “या जगात प्रेम नसेल, तर जग जगणारच नाही, प्रेमसूर्य जर कायमचा अस्तगत झाला तर जग चालेल कसें? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. माता मुलांवर प्रेम करणार नाहीत तर ती अगतिक मुले कशीं वाढतील? आईचें मुलांवरील प्रेम-ही गोष्ट तरी सत्य मानता की नाही?”