‘मला मार्ग दाखवा माझें मन स्थिर होत नाही. ते अभ्यासांत रमत नाही. शेंकडो ध्येयें डोळ्यासमोर येतात व ती तंद्रींत राहातों. कधी रामतीर्थ कधी विवेकानंद, कधी रवींद्रनाथ टागोर, तर कधी नंदलाल बोस-माझ्या डोळ्यासमोर थीरा मोठ्यांची चरित्रे येतात. मी विचाराच्या नादांतच राहातों. मी पहाटें उठून वाचू लागतों. पांच मिनिटें वाचून होतात व हातात तोंच मन कोठेंतरी उड्डाण करून जातें’
त्या पत्रात पुष्कळ मजकूर होता. त्या पत्राला दैनिकांत स्वामीनी उत्तर दिले. ते पत्र जसेंच्या तसें दैनिकात त्यांनी दिलें होतें. फक्त नामदेवाचें नांव त्यांनी गुप्त ठेविले होते. स्वामीच्या उत्तरांतील महत्त्वाचा भाग ध्यानांत घरण्यासारखा होता.
केवळ ध्येयाच्या विचारांत राहणे योग्य नाही. ती एक प्रकारची कर्महीन गुंगी आहे. केवळ विचारांतच राहण्याची मग आपणास सवय होते. ज्या वेळेस जें काम हाती असेल, त्या वेळेस त्यातच बुडून गेलें पाहिजे. रामतीर्थ विद्यार्थिदशेंत चोवीस तास अभ्यास करीत. स्वप्नांतहि गणितांतील प्रमेयें व सोडवीत असत. रामतीर्थांची दिव्यता आपणांस दिसते. परंतु त्यांचे निष्ठापूर्वक रात्रंदिवस केलेले प्रयत्न ते आपणांस दिसत नाहीत. झाडावरचीं फुले फळें दिसतात. परंतु झाडें रात्रदिवस ओलावा मिळावा म्हणून मुलांच्या साहाय्याने कशी धडपडत असतात ते जगाला दिसत नाही. आज तुम्ही विद्यार्थी आहा. वाचा, मनन करा; शरीर कमवा, ज्ञान मिळवा. आज पाया भरावयाचा आहे. अशा वेळेस मनाला मोकाट सोडणें योग्य नाही. स्वत:शी कठोर झालें पाहिजे. कोंडलेला मनुष्य हवेसाठी, बुडणारा काठासाठी कृपण कवडीसाठी, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची ज्ञानासाठी तडफडलें पाहिजे. ज्ञान, प्रेम व सामर्थ्य मिळवा.
‘तसेच आपल्यांतील दोषांचे सारखें चितन करीत बसू नये. आपल्यातील दोषांची सतत खंत बाळगीत राहिल्याने ते दोष उलट दृढमूल होतात. आपण आपल्यांतील सर्दशावर दृष्टी केंद्रीभूत केली पाहिजे. मी वाईट आहे, मी असाच चंचल सदैव असणार असें म्हणत बसाल तर तसेंच व्हाल. मी ईश्वराचा पुत्र आहे, परमात्यम्याचा अंश आहे, मी मंगल आहे, शिव आहे, सुंदर आहे, समर्थ आहे असा संकल्प कराल तर तसें व्हाल. ते विचार मनांत नांदवाल तसें व्हाल आपलें आजचें जीवन कालपर्यंत केलेल्या विचारांचे फळ आहे. जे विचार खेळवाल तसा वृक्ष होईल. आजचा दिवस माझा चांगला गेला असे ज्याला निजताना म्हणता येईल व आजची माझी रात्र चागली गेली असें उठताना ज्याला म्हणता येईल ते परमकृतार्थ होय, ती मुक्त पुरुषच होय.’
नामदेवाला उत्तर वाचून आनंद झाला. त्यानें तें उत्तर कितीदां तरी वाचलें. कोणी मुलें वाचनालयांत नाहीत असें पाहून त्यानें तो दैनिकाचा अंक हृदयांशी दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेविला. डोळे मिटून बसला.
“नामदेव, झाला का वाचून अंक ? मला दे,” एक मुलगा म्हणाला नामदेवाने डोळे उघडले. तो अंक त्या मुलाला देऊन नामदेव निघून गेला.