नामदेवाला एक शब्दही बोलवेना. त्याचे डोळे मात्र भरून आले . खिडकीच्या बाहेर तोंड काढून तो उभा राहिला व मुके अश्रू ढाळू लागला. तो आपले डोळे मिटी ? वेणूचे सुंदर डोळे गेले. माझेही जोवोत, असे त्याला वाटले! जगाला मोह घालणारे डोळे ! कशाला ते राखा, कशाला त्यांचे कौतुक, असे का त्याला वाटले ? का आपले डोळे वेणूला जावेत, अशी तो प्रार्थना करीत होता?
“नामदेव ! काय आता करावयाचे? कोणते उपाय आपण गरीब लोक करणार ? वेणूला कोठे नेणार, कोणाला दिखविणार ? गरिबाच्या दुखण्याला औषध नाही, गरिबाच्या दुखण्याला अंत नाही. वेणूचे सारे आयुष्य आता अंधारात जाणार ! अंधार, भयाण अंधार, न संपणारा अंधार! पाखरासारखी उडू पाहणारी, हरणासारखी उडया मारणारी माझी वेणू ! आता कोप-यांत बसून राहील! अभागी वेणू आणि तिचा दरिद्री भाऊ अभागी रघुनाथ !”
रघुनाथाच्याने राहवेना. नामदेव काही बोलेना.
“नामदेव ! सांग ना तू तरी काही,” रघुनाथ रडत म्हणाला.
“काय सांगू माझे डोळे वेणूला देऊ ? काय करू मी? एकाएकी असे जे डोळे जातात, त्याला उपाय नसतो म्हणतात. कारण रोग नसतो, दुखणे नसते. खुप-या नाही, फुले नाहीत, मोतीबिंदु नाही, सारा नाही; काही नाही. जसे अकस्मात कारण नसताना गेले, तसे अकस्मात येतील. या आशेशिवाय दुसरे आपण काय करणार ? मुंबईला वगैरे कोणाला दाखवू म्हणले तर कोठे आहेत आपणाजवळ पैसे? स्वामी काहीतरी खटपट करतील. भिकाने स्वामींना कळवले असेलच. स्वामींचे पत्र येईपर्यंत आपण शांत राहू या,” नामदेव म्हणाला.
स्वामींना भिकाने कळविले. स्वामी आले. टांगा करून त्यांनी वेणूला अमळनेरला आले. तेथील नामांकित डॉक्टरांनी डोळे पाहिले. अर्थ नाही. याला उपाय नाही,” असे डॉक्टर म्हणाले.
“मुंबईला नेऊन दाखवू का ?” स्वामींनी विचारले
“दाखवा पाहिजे तर. परंतु आशा नाही. मनाला रुखरुख नको म्हणून दाखवून आणा,” असे डॉक्टर म्हणाले.
स्वामी वेणूला घेऊन मुंबईला गेले. डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून परिक्षा घेण्यात आली. ‘याला इलाज नाही’ असेही सर्वांचे म्हणणे पडले. स्वामींना वाईट वाटले. सारा जन्म आंधळेपणात जाणार.!