“परंतु तुमच्यामुळेंच हें सारे सुचू लागलें, रूचू लागलें, पचूं लागले,” नामदेव म्हणाला.
“मी म्हटलें तुझे ‘चू’ थांबतात की नाही?” रघुनाथ थट्टेने म्हणाला.
वादविवाद करीत करीत तिघे मारवडपर्यंत आलीं. मारवडपासून देवपूर जवळ होतें. धर्मा झोंपडीच्या दारांतच उभा होता.
“स्वामी,” त्यानें टाळी पिटली.
त्याची आई बाहेर आली.
“कसें आहे, बरें आहे ना धर्मा?” स्वामींनी विचारलें.
“आज तुम्ही एकटे नाहीं, आज तिघें,” धर्मा हंसत म्हणाला.
“तिघांचा दत्तात्रय,” स्वामी म्हणाले.
“हा घे तुला खाऊ,” नामदेव म्हणाला.
“मला खाऊ? मी का तुमचा भाऊ?” धर्मानें विचारलें.
“होय. आपण सारे भाऊ,” नामदेव म्हणाला.
“जातो, धर्मांची आई. देवपूरला जायचें आहे,” स्वामी म्हणाले.
“किती तुमचा लोभ, किती दया,” म्हातारी म्हणाली.
मगन, तुकाराम मास्तर रस्त्यांत भेटलेच.
“जाताना येथें थांबून जा. दोन शब्द सांगून जा.” ते म्हणाले.
“बघू,” स्वामी म्हणाले.
देवपूर जवळ आलें. देवपूरची नदी दिसू लागली. देवपूरपासून मैलदीड-मैलावर तापी व अमळनेरची बोरी यांचा संगम आहे. देवपूरला नदीला बारा महिने पाणी असे. रघुनाथ त्याच नदींत लहानपणी पोहावयास शिकला त्या नदीच्या वाळवंटांतच खेळला, कुदला.
“आलें माझे देवपूर,” रघुनाथ म्हणाला.
“गावाचें नांव तर गोड आहे,” स्वामी म्हणाले.
“गांवहि गोड आहे,” रघुनाथ म्हणाला.
“आता चव घेऊच,” स्वामी म्हणाले.
तिघे गांवांत शिरले. गांवची मंडळी रामराम करु लागली. स्वामी सर्वांना प्रेमानें प्रणाम करीत होते. बरोबरचीं मुलें रघुनाथच्या हाताला येऊन झोंबलीं. रघुनाथहि त्यांच्याजवळ बोलू लागला.
आलें. रघुनाथचें छोटे घऱ आलें.
“आई,” रघुनाथनें हांक मारली.
रघुनाथची आई विनयानें जरा दारांत डोकावली.
“आई! हे स्वामी हो.” रघुनाथ म्हणाला.
“आणि ते तुझे नामदेव, होय ना?” वेणूनें विचारलें.
“होय,” रघुनाथ म्हणाला.
“नामदेवचें नांव तुला काय माहीत, वेणू?” स्वामीनीं विचारलें.
“रघुनाथभाऊ त्यांच्या तुमच्या कितीतरी गोष्टी आला म्हणजे सांगतो.
यांनी कंदिलावर हात भाजून घेतला होता. आणि किती किती तरी गोष्टी. नाहीं का रे भाऊ?” वेणू गोड बोलत होती.
“तू आपली गोड वेणूच आहेस,” स्वामी म्हणाले.
“पण बाबूची नाही हो,” वेणू म्हणाली.
“आई! आम्ही नदीवर आंघोळ करून येतो हां,” रघुनाथ म्हणाला.
“रघुनाथ! थोडें गुळपाणी दे ना. वेणू, दुकानावरुन थोडा गूळ घेऊन ये जा,” आई म्हणाली.
वेणू पळत गेली व पळत आली.
“वेणू, तुझी सारी धांवपळ, पडशील हो,” स्वामी म्हणाले.