‘तू अशीच निशिदिन टाक गडे मोहिनी ।
निशिदिन टाकी गडे मोहिनी ।।’
‘डोळे हे जुल्मी गडे, रोंखुन मज पाहूं नका ।
आग उगा लावूं नका ।।’
असलीं गाणीं तुमच्या ओंठावर आहेत कीं
‘भारतमाता हांका मारी ।
चला चला रे करूं तयारी ।।
कुरवंडी करुं निज देहाची ।
पूजा बांधूं भारतभूची ।।
सगें बंधू मरति उपाशी ।
खाता कैसें पोळितुपासी ।।
सुचो, रुचो ना आता काहीं ।
हांका मारी भारतमाई ।।
असलीं गाणीं तुमच्या ओठांवर आहेत ? आजची कला तुम्हांला काय सांगत आहे, काय शिकवीत आहे ?
“आजूबाजूच्या जीवनाचें रान पेटलें असतां त्या नीरोप्रमाणें तुम्ही का पेटी वाजवीत बसणार ? तुम्ही खात पीत आलापत बसणार ? काय आहे आजच्या कलेचा तुम्हांस संदेश ?
“कलेचा संदेश ? हा शब्दप्रयोग तुम्हांला चमत्कारिक वाटेल. कलेसाठीं कला हे थोतांड हल्लीं माजलें आहे. कलेसाठीं कला ही वस्तुच अस्तित्वांत नाहीं. निर्विकार व निर्विचार कला असू शकते का ? चित्र पाहा, गीत ऐका, अभिनय पाहा, पुस्तक वाचा. त्यांतून मनावर कांहीं परिणामं होतो कीं नाहीं ? जर परिणाम होत असेल तर तो सत् होतो कीं असत् होतो हें पाहिलें पाहिजे. आपण जें जें पेरतों, त्याच्यांतून कांहीं उगवणआर असेल, त्याच्यांतून पीक येणारच असेल, तर तें पीक अफूचें आहे कीं गव्हाचें आहे हें पाहिले पाहिजे.
“समाजाचें मंगल हें कलेचें ध्येय आहे. हें मंगल कोणी ठरवावयाचें ? त्या त्या काळांत महापुरुष असतात ते त्या त्या काळांतील समाजाला ध्येयें देत असतात. ‘नाम्यः पंथा विद्यते त्रय नाम, एष पंथाः’ अशी बाहु उगारून ते घोषणा करीत असतात. आजच्या काळांत कोण महापुरुष आपणांस वाटतो तें आपण पाहिलें पाहिजे. महापुरुष कलावंताला ध्येय देतो व कलावान त्या ध्येयबाळाला वाढवितो. महापुरुष हा पति आहे व कलावान त्या महापुरुषाची पत्नी आहे. महापुरुष हा द्रष्टा असतो, ऋषी असतो. कलावान त्याच्याभोंवतीं प्रदक्षणा घालतो. एकच व्यक्ति ऋषि व कवि अशी क्वचित् दृष्टीस पडते. कलावान व ध्येयवान अशी व्यक्ति फारशी आढळत नाहीं. व्यास, वाल्मिकी हे ऋषीहि होते व कलावानहि होते. परंतु त्यांतल्यात्यांत व्यासांची प्रतिभा कमी व प्रज्ञा थोर, तर वाल्मिकींची प्रज्ञा जरा कमी, परंतु प्रतिभा थोर असें म्हणावें लागतें. व्यासांना कवि न म्हणतां महर्षि म्हणावें लागेल व वाल्मिकींस महर्षि न म्हणता कवीश्वर म्हणावे लागेल. ज्ञानेश्वर हे ऋषीहि होते व कलावानहि होते. रवींद्रनाथ ध्येयें देतील व ध्येयें कलेच्या रंगानें रंगवितील.