“हा खादी कार्यक्रम गोड असतो,” एक मुलगा म्हणाला.
“परंतु अंगावर खादी घालण्याचा कार्यक्रम जड जातो नाही?” स्वामींनी विचारलें.
“यशवंत, फिरावयास येतोस? नामदेवानें विचारलें.
“हो, चल आपण नदीकडे जाऊ,” यशवंत म्हणाला.
दोघे नदीकडे गेले. प्रथम कोणी बोलत नव्हते. शेवटी नामदेवानें बोलावयास सुरुवात केली.
नामदेव-यशवंत ! पूर्वी तू कोठें होतास?
यशवंत:-बडोद्याला शिकत होतो. तेथे मी घोड्याच्या गाडीतून शाळेत जात असे, तेथे केवढी माझी ऐट
नामदेव- तेथे तुला कोणी मित्र होते का?
यशवंत – कोणी नाही.
नामदेव – येथे कोणी मित्र आहे.
यशवंत – अजून माझा कोणाशी फारसा परिचयच नाही.
नामदेव – होईल हळूहळू. तू मुलांत मिसळत जा. खोटा मोठेपणा सोड. खेळायला जात जा.
यशवंत – मला व्हॉलीबॉल आवडतो.
नामदेव – मग जात जा ना. मला खेळायला नाही आवडत. परंतु तू जात जा. खेळण्याने मोकळेपणा येतो. अहंकार जातो कृत्रिम भेद मावळतात. स्वामी सांगतात की कृष्णपरमात्मा गोकुळांतील सर्वांना खेळायला लावी. असें करुनच त्यानें सारे भेदभाव नष्ट केले. कृष्णानें खेळाची दिव्यता दाखविली. खेळ ही दैवी वस्तु आहे.
यशवंत – भगवान कृष्णानें क्रीडेचें महत्त्व ओळखले. कृष्णानेंच श्रमाचें महत्त्व वाढविले.
नामदेव- आणि कृष्ण कांबळा पांघरे व वनमाळ घाली. यशवंत, तू खादी केव्हापासून वापरणार? खादी म्हणजे स्वामीचा प्राण आहे. खादी वारणा-याला दहा खून माफ असें एखादे वेळेस ते विनोदानें म्हणतात.
यशवंत – त्या दिवशीचें खादीचे प्रवचन ऐकून मला खूप वाईट वाटलें. मुलें सारखी माझ्याकडे पाहात होती.
नामदेव – यशवंत ! तू खरोखर चांगला आहेस. आमच्या सर्वापेंक्षा तू पुढें जाशील.
यशवंत – आजपर्यंत माझ्याजवळ मोकळेपणानें कोणी बोललें नाही. नामदेव तू माझा मित्र हो. नामदेव, मी वाईट आहे. मला गर्व आहे, ऐट आहे.