“परंतु इतक्यात काय घाई आहे ? आणखी दोन वर्षे थांबले म्हणून काय झाले ? वेणूसारखी मुलगी कोणीहि करील. आपण उगीच काळजी करत असतो. देवाच्या योजना ठरलेल्याच असतात,” नामदेव म्हणाला.
“देवाच्या योजना ठरलेल्या असतात असे म्हणून भागत नाही. आपण प्रयत्न करीत राहिले पाहिजे. देवाच्या योजनेत ते बसले तर ते यशस्वी होईल. न बसले तर यश मिळणार नाही,” रघुनाथ म्हणाला.
“तेथील आश्रमांत वेणू काम करील. प्रभातफेरी काढील, लिहील, वाचील. वेणू तयार होत आहे. तिची बुद्धी चांगली आहे. मन थोर आहे. तिचे डोळे कसे काळेभोर, मोठे आहेत,” नामदेव म्हणाला.
“ज्यांचे डोळे मोठे असतात, त्यांचे हृद्यहि मोठे असते. नामदेव ! तुझे डोळे सुद्धा मोठे आहेत. सृष्टीतील सौर्द्य पिण्यासाठी जणू ते अधीर आहेत असे वाटते,” रघुनाथ म्हणाला.
नामदेव, रघुनाथ व स्वामी त्या दिवशा आश्रमांतून निघून गेल्यावर वेणू रडली. आपण का रडत आहोत ते तिचे तिलाच समजेना. तिचे अश्रू थांबतना. ते अश्रू होते, की साधे पाणी होते ? ती डोळ्यांचीच फक्ता गळती होती की हृद्यातील गळती होती ? किती प्रेमाने वेणूने त्या दिवशी भाकरी केल्या होत्या ! किती वेळ ती चुलीशी बसली होती. केवढे समाधान तिच्या जीवाला वाटत होते ! त्या का साध्या पिठाच्या भाक-या होत्या ! त्या भक-यांत आणखी काही होते का ? त्या भाक-यांतून वेणूने स्वत:चे हृद्या का सर्वांना वाढले ? त्या भाक-यांतून जीवरस का वाढला ?
“ आई, सारखे डोळ्यांतून पाणीच आज येत आहे. जरा वर बघावे तर डोळे आपले भरून येतात. का ग असे होते ?” वेणूने विचारले.
“तुला चुलीजवळ बसायची सवय नाही. ती परवा चुलीजवळ बसलीस एकटीने सा-यांच्या भाक-या भाजल्यास. त्रास झाला असेल डोळ्यांना,’ आई म्हणाली.
“पण त्या वेळेस कोठे येत होते पाणी ? भाऊ वैगरे सारे जाईपर्यंत डोळे कसे चांगले होते. ते गेल्यावरच हे असे का बरे होत आहे. डोळे दुखत नाही, खुपत नाहीत; परंतु गळती मात्र थांबत नाही.” वेणू म्हणाली.
“थांबेल हो पाणी. जरा नीज. पडून राही. आज कांतू नको, पिंजू नको. वाचू नको, लिहू नको. तू अलिकडे सारखे वाचीतच बसतेस,” आई म्हणाली.
“आई, वाचले म्हणजे कितीतरी समजते. भाऊला मी बहीण शोभले पाहिजे. स्वामी त्या दिवशी नाही का म्हणाले की, ‘वेणू वाचीत जा, विचार मिळवीत जा,’” वेणू म्हणाली.
“बरे मी जाते नदीवर. तू पडून राहा.” असे म्हणून वेणूची आई धुण्याची मोट घेऊन नदीवर गेली.
वेणू एकटीच घरांत होती. मध्येच गाणे गुणगुणे, मध्येच नाचे. वेणू वेडी झाली होती.