“गोपाळराव! एखादाच शब्द, परंतु मानवी हृदयांत त्या शब्दानें केवढाल्या उलथापालथी होतात, नाही?” स्वामीनीं विचारलें.
त्या दिवशी काय झालें कोणास कळे, परंतु स्वामीनीं गोपाळरावांस एकदम चिठ्ठी पाठविली. ‘मी आजपासून आपणाकडे जेवावयास येणार नाही. आपल्याकडे जरा श्रीमंती अन्न असतें. तूप दहीं जास्त असते. दूध जास्त असतें. मला असें अन्न खाण्याचा अधिकार नाही. मला आग्रह करू नका,’ अशा अर्थाचा मजकूर त्या चिठ्ठींत होता.
ते पाहा गोपाळराव स्वामींकडे येत आहेत. गोपाळरावांची मुद्रा म्लान दिसत आहे. ते स्वामींच्या खोलींत शिरले. त्यांच्याने बोलवेना. स्वामी गोपाळरावांकडे पाहात होते. गोपाळरावांना एकदम जोराचा हुंडका आला. स्वामी खाली पाहूं लागले. शेवटी गोपाळरावांनी अश्रू आवरिलें. ते म्हणाले, “ स्वामी! आजपर्यंत हा गोपाळराव कोणासम र रडला नाही. या जगाला अश्रूंची किंमत नाहीं. परंतु आज तुमच्यासमोर माझे डोळे रडत आहेत. माझें हृदय आरडत आहेत. तुम्ही माझ्याकडेच जेवायला या तुम्हाला हवी तर शिळी भाकर मुद्दाम ठेवून वाढीत जाऊं. म्हणजे तर झाले?”
स्वामीचा निश्चिय त्या अश्रूपुरांत कोठल्याकोठें वाहून गेला. गाईपाठीमागून वासरू, माणसापाठीमागून छाया, देवापाठीमागून भक्त त्याप्रमाणे गोपाळरावांच्या पाठोपाठ स्वामी गेले.
अशाप्रकारे स्वामी व गोपाळराव परस्परांच्या जीवनांत शिरत होते. ते एकमेकांपाशी फारसें बोलत नसत. कांही बोलायचेंच झालें तर चिठ्ठी पाठवीत. ते एकमेकांजवळ डोळ्यांनी बोलत. परस्परांनी परस्परांस बंधणे म्हणजेच सारें बोलणें होतें. गोपाळरावांना माहीत नव्हतें की, स्वामी आपल्या जीवनांत इतक्या उत्कटतेनें स्थान घेतील. स्वामीनाहि माहीत नव्हतें की गोपाळरावांची व आपली अशी थोर शब्दहीन नि:स्तब्ध मैत्री जडेल. आपल्याला माहीत नसलेल्या अनंत गोष्टी, कल्पना नसलेल्या शेंकडों गोष्टी परमेश्वर प्रत्यक्ष समोर आणून ओतीत असतो!