गांवोगांवचे लोक हे सेवाकर्म पाहावयास येत होते. अमळनेरची किती तरी मुले सायकलवरून येत. थोडा वेळ त्यांनाहि स्फूर्ति येई. तेहि दोन घाव टिकावाचे घालीत. तेवढेच हातांना पावित्र्य! एक दिवस अमळनेरचे चार वकील सायकलवरून आले. त्यांनीहि रस्त्यांत दगड पसरले. सर्वांनी ‘महात्मा गांधी की’ जय केला.
“तु्म्ही कशाला रावसाहेब आलात?” देवपूरचे लोक वकिलांना म्हणाले.
“अरे, आमच्या स्वार्थासाठी. अमळनेरचे अमुक वकील आले होते हे तुम्हांला स्मरण राहील. तुम्ही आम्हांला विसरणार नाही, ” एक वकील म्हणाले.
“अहो, आमची मुले आहेत येथे काम करण्यात, मग आम्हांला का घरी राहवते? म्हटले जावे अर्धा घटका तरी, ” दुसरा म्हणाला.
“या गांधींनी सर्वांना वेड लावले आहे. सर्वांना जुंपले आहे गाड्याला, ” तिसरा म्हणाला.
“सारे ओढतील तेव्हांच राष्ट्राचा गाडा पुढे चालेल, ” चौथा म्हणाला.
अशा प्रकारे हे सेतुबंधन चालले होते. हे मागसृजन चालले होते. रस्ता तयार झाला. सुंदर रस्ता झाला. मुलांचा आनंद कोण वर्णन करील? मुले बाजूला उभी राहून रस्त्याकडे बघत व लोटांगण घालीत!
उद्या छावणी उठणार होती. उजाडल्या पहाटे प्रार्थना होऊन ती थोर मनाची मुलं परत जाणार होती. उरलेले सुटीचे पंधरा दिवस प्रेमळ आईबापांच्या संगतीत घालविण्यासाठी ती जाणार होती. रात्रीचे जेवण झाले. प्रार्थना झाली. सारी मंडळी वर्तुळाकार बसली होती. स्वामी शेवटचे दोन शब्द सांगणार होते. सर्वत्र शांतता, गंभीरता पसरली होती.
“माझ्या सार्या प्रेमळ मित्रांनो! मी तुम्हांला काय सांग? माझे हृदय खरोखर शतभावनांनी भरून आले आहे. माझ्या हांकेस ओ देऊन एक महिनाभर जवळ जवळ येथे उन्हातान्हांत अत्यंत आनंदाने तुम्ही काम केलेत. कोणाला बारिकसारिक दुखापतिहि झाल्या. परंतु ईश्वरकृपेने कोणी आजारी वगैरे पडले नाही. या प्रसंगाची आठवण तुम्हांला जन्मभर पुरेल. हा सेवेचा सुवास सर्व जन्मभर येत राहील. सेवेचे एक सत्पुण्य सर्व जीवनाला सुगंधी करू शकते. तुम्ही येथे श्रम केलेत. परंतु त्याचा अभिमान बाळगू नका. वर्षेच्या वर्षे शेतकरी तुमच्यासाठी उन्हातान्हांत, चिखलात, काट्यात काम करीत असतो. तो दिवस पाहात नाही, रात्र पाहात नाही; थंडी पाहात नाही, पाऊस नाही. तुम्हाला धान्य मिळावे तुम्हांला भाजी मिळावी, तुम्हांला दूधतुप मिळावे, तुमच्या कपड्यासाठी कापूस मिळावा. या सर्व गोष्टींसाठी कोट्यवधि शेतकरी वर्षानुवर्षे खपत असतात! आपण दहा वीस दिवस गंमतीने, खेळीमेळीने काम केले. परंतु शेतक-यांच्या अपरंपार श्रमापुढे हे आपले श्रम काहीच नाहीत! या कामाचे महत्त्व एवढेच की आपण आपल्या भावाचे स्मरण केले! कृतज्ञतेने त्याच्या घरी क्षणभर आलो.
“मित्रांनो! हा लहानसा रस्ता एक दिवस स्वातंत्र्याकडे घेऊन जाईल. ज्या वेळेस शहरांतील सुशिक्षित लोक खेड्यांतील जनतेस शिरून एकरूप होतील, त्या वेळेस स्वातंत्र्याचा मार्ग तयार होईल! या रस्त्यावर तुम्ही दगड, धोंडे आणून टाकलेत! परंतु स्वातंत्र्याच्या मार्गावर स्वत:च्या जीवनांचे दगड, धोंडे ओतावे लागतील. लाखो जीवने स्वत:ला गाडून घेतील, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल!