“मी म्हणजे वाटतें तुमची मीठमिरची, चटणी, लोणचें ?” स्वामीनीं विचारलें.
“तुम्हो म्हणजे आमचें सर्व काही,” नामदेव म्हणाला
“जेवणें झाली.
“भांडी घासावयाची की काय?” स्वामींनीं विचारलें.
“घास सायंकाळी,” रघुनाथ म्हणाला.
“तोंपर्यंत त्यांना असेंच रडत ठेवणार?” आपल्यासाठी ती घाणेरडी झाली त्यांना लगेच स्वच्छ करुन ठेवू या,” स्वामी म्हणाले.
“चला घासू. आम्ही घासूं व तुम्ही विसळा,” नामदेव म्हणाला.
भांडी घासून झालीं. अडी व वाजायची वेळ झाली
“तुम्ही जरा पडा,” नामदेव म्हणाला.
“थोडं कांततों, गाडींत गर्दी होती फार. त्यामुळे झालें नाही,” स्वामी म्हणाले.
स्वामी सूत कांतीत बसले. मनांत विचार करीत होते. तीन वाजले.
“चला आता जाऊ,” रघुनाथ म्हणाला.
“चला,” स्वामी म्हणाले.
“बरोबर कांही घ्यावयाचे आहे?” नामदेवानें विचारलें.
“फक्त मला घेऊन चल,” स्वामी म्हणाले.
कॉलेजच्या सभागृहांत विद्यार्थी जाऊन बसले होते. हे कोणते स्वामी, कसे आहेत, दाढी वगैरे आहे कीं काय, रंगीत वस्त्रे आहेत की काय, पायांत खडावा आहे कीं काय, कसें बोलतात, काय करतात, एक का दोन, अनेक प्रकारची जिज्ञासा मुलांना होती. विद्यार्थिनीहि जाऊ लागल्या सभागृह भरून गेले.