गोपाळराव अमळनेरमधील इंग्रजी शाळेंत शिकवावयासहि जात. ते उत्कृष्ट शिक्षक होते. शास्त्रासारखा रुक्ष विषय; परंतु ते कादंबरीसारखी तो रसाळ करुन सांगत. शास्त्राचा अभ्यास मुलांच्या जीवनात ते आणीत. पोळी का फुगते, भाकरीला पापुद्रा कां सुटतो, गोंवरीचीच राखंडी चांगली कां. सारे प्रश्न ते सोडवावयाचे. ते स्वामीजवळ एकादे वेळेस म्हणत, ‘जगांत एक तरी गोष्टीची मी ऐट मारीन.’ मी सायन्स फार उत्कृष्ट शिकवितों. माझ्यासारखा सायन्स शिकविणारा शिक्षक क्वचित्च असेल.

त्यांच्या कर्तव्यनिष्ठेमुळें इतर शिक्षकांस त्यांच्याबद्दल आदर वाटे. परंतु गोपाळरावांनी त्यांना भीतिहि वाटे. गोपाळराव केव्हां काय बोलतील याचा नेम नसे. केव्हां काय करतील याचा नम नसे. एकदां एका शिक्षकांकडे त्यांच्या नकळत ते गेले व मुलांची प्रश्नोत्तरें तपास लागले. ते शिक्षक घरीं येतात तों गोपाळराव प्रश्नोत्तरे तपासण्यांत तन्मय झालेले त्यांना दिसले! ते दारांतच आश्चर्यानें उभे राहिले.

“हें काय गोपाळराव! वा, वा,” असें म्हणून त्या शिक्षकांनी गोपाळरावांच्या हातांतील प्रश्नोत्तरपत्रिका ओढून घेतली.
“तुम्ही केव्हां आलात? मला कळलेहि नाही. आतां तुम्ही सारे पेपर वेळेवर पुरे कराल. तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी आलों होतों,” गोपाळराव म्हणाले.

“मला प्रश्नोत्तरें तपासून द्यावयास नेहमी उशीर होतो, म्हणून तुम्ही हा प्रयोग केलात वाटतें? गोपाळराव, आम्हाला असें लाजवण्यानें काय होणार आहे? या गोष्टीस एवढें महत्त्व कां द्यावे? काय आहे या शाळांतून? दोन दिवसांची उशीरां दिले पेपर म्हणून स्वराज्य थोडेंच दूर जाणार आहे? या ध्येयहीन शाळांतून एवढीच तेवढी साहेबी ऐट कशाला?” ते शिक्षक म्हणाले.
“तुमचें म्हणणें एक अर्थी बरोबर आहे. परंतु एकदां जें पत्करलें ते नीट पार पाडणें चांगले नाही का?” गोपाळराव म्हणाले.
“म्हारकी करावयाची, परंतु तीहि नीट केली पाहिजे असेंच तुमचें म्हणणें ना?” त्या शिक्षकांनी विचारलें.
“हो” गोपाळराव म्हणाले.

इतर शिक्षकांत न मिसळणा-या एखाद्या शिक्षकाकडे इतर कांही मित्र बरोबर घेऊन गोपाळराव मुद्दाम जावयाचे व म्हणावयाचे, ‘करा बोवा कांही पोहेबिहे करा. तुमच्याकडे खावेसें वाटतें आहे. कां केळीं आणता? तो पाहा केळीवाला चालला आहे. मारुं का हांक?’ अशा रीतींने ते सहकार्य वाढवावयाचे. समाजाच्या सहकार्यासाठी त्याग करावयास शिकवावयाचे.

एकदा एका वकिलाच्या घरीं ते गेले. तो तेथे गादीवर केर पडलेला गोपाळराव केर काढायला लागले. वकीलसाहेब लाजले.
“अहो, हें काय गोपाळराव? गडी आहे तो झाडील.” वकील म्हणाले.

“परंतु मी आहे ना गडी. बीडिंगांतील गडी रागावून गेला तर मोठमोठीं भांडीहि घासण्याची या हातांना सवय आहे. या हातांना एकाच गोष्टीचा तिटकारा आहे व तो म्हणजे लेखणीचा,” ते म्हणाले.

“झाडू द्या हो त्यांना. झाडा गोपाळराव. अहो, एम. ए. बी. एससी. झालेला झाडू आपणांला तरी कधी मिळणार? गोपाळराव, या कपबश्याहि खाली नेऊन ठेवा,” दुसरे तेथें एक वकील होते ते म्हणाले.

“अहो, महात्मा गांधींसारखे झाडू तुम्हांला लाभले आहेत: माझें काय घेता? तुमच्यासारखे भाग्यवान् तुम्हीच. जगांत असा कोणता देश असेल की, जेथल्या जनतेला महात्मा गांधीसारखे झाडू मिळाले असतील? हे भारतीयांचेंच श्रेष्ठ भाग्य होय,” गोपाळराव म्हणाले.

गोपाळराव जगाबद्दल नेहमी वाईट मत धरुन चालवायचे. ते म्हणत, ‘मनुष्य वाईट आहे असें धरून आपण चालावे. तो जर चांगला पुढे दिसून आला तर ठीकच आहे. परंतु एकादा मनुष्य चांगला आहे म्हणून प्रथम आशा करून राहावें, आणि त्यानें शेवटीं आपलें घाणेरडे रूप दाखवावें. अशा वेळेस जी निराशा होते, जे दु:ख होतें त्याची कटुता त्या निराश होणा-या सच माहीत. असें निराशेंचें दु:ख करावयास लागण्यापेक्षा ती आशा न करणेंच बरें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel