पुण्यास भेट

अमळनेरच्या शाळेंतील पुष्कळ विद्यार्थी पुण्यास शिकत होतें. त्या सर्वांना स्वामींची माहिती होती. पुण्यांतील भाऊ कॉलेजमध्ये अमळनेरचा एक विद्यार्थी वक्तृत्वोत्तेजक मंडळाचा चिटणीस होता. त्यानें स्वामींना एखादें व्याख्यान द्यावयास या असें आग्रहानें लिहिलें. नामदेव व रघुनाथ यांनीहि आग्रहानें या असें लिहिलें. नामदेव व रघुनाथ यांचाच खरा तो सारा प्रयत्न होता. चिटणीस निमित्तमात्र होता.

पुण्यास जावें कीं न जावें, स्वामींचा निश्चय होईना. पुण्यांतील विद्यार्थ्यांना मी काय सागू? प्रवचनें. व्याख्यानें, चर्चा यांनी अजीर्ण झालेल्या पुण्यांतील विद्यार्थ्यांना काय सांगावयाचे? कॉलेजमधील मुलांची कशावरहि श्रद्धा नाहीं. त्यांच्यासमोर जाऊन मी कोणता ध्येयवाद मांडू? पुण्यांतील केसरींने महाराष्ट्रांतील जनतेची त्रिशूंकसाऱखी स्थिति केली आहे. सर्व गोष्टींची टर उडवावी हेंच जणुं पुण्यांतील तरुणांचे ध्येय झालें आहे. ध्येयहीन माणसें हाच जेथें पुरुषार्थं झाला, आम्हांला ध्येय वगैरे समजत नाही. आम्हांला चिवडा चिरूट समजतो असेंच जेथें प्रौढीनें सांगण्यांत येते, तेथे जावें का आपण?

परंतु शेवटीं आस्तिक्य भावनेचा जय झाला. पुण्याला मनांत आपण नांवें ठेविलीं त्याचें यांना वाईट वाटलें. ज्या पुण्याची आठवण येऊन न्यायमूर्ति रानडे उत्तर हिंदुस्थानांतील प्रवासांत रडले, त्या पुण्याला कां मी नांवें ठेवू? महाराष्ट्राचा मध्यकालीन व अर्वाचीन इतिहास ज्या पुण्यानें घडविला त्याला मी नांवे ठेवू? पुण्यांतील तरुण सारेच कांही फुलपांखरी वृत्तीचे नसतील. दिव्य ध्येयाचें दर्शन होत नाही म्हणूनहि निराशेंनें कांही तरुण एकप्रकारचा स्वत:वर सूड म्हणून मग केवळ सुखविलासाकडे वळतात. अशा जीवनांवर न रागावता सूड म्हणून मग केवळ सुखविलासाकडे वळतात. अशा जीवनांवर न रागावता त्यांची कींब केली पाहिजे. मनुष्याच्या हृदय गाभा-याच्या आंतील भागांत शेवटी शंकराची पिंडी आहे, मांगल्याची मूर्ति आहे हें विसरून कसे चालेल? मीं पुण्याला गेलेंच पाहिजे. भिऊन चालणार नाही, निराश होऊन चालणार नाही. जें आपल्याला प्रिय आहे, त्याचा सतत प्रचार करणें यांतच खरी श्रद्धा आहे. संतांना रामनाम आवडे, त्याचा त्यांनी सर्वत्र प्रसार केला

“अवघें जगचि दुमदुमित | नामघोषें भरलें.

आम्हीहिं आमच्या ध्येयाचें वारकरी झाले पाहिजे. त्या ध्येयाची ध्वजा नेहमीं खांद्यावर असली पाहिजे. जपानी लोक आपल्या मालाचा कसा प्रसार करतात? आपल्या विचारांचा तसा आपण सर्वत्र प्रसार केला पाहिजे. केले पाहिजे, सांगितले पाहिजे. ज्यानें त्यानें ठोठावीत राहावें. आपण सारें या जगाच्या गोळ्याला आकार देत आहोंत. ज्याचा प्रयत्न अधिक, त्याग अधिक, श्रद्धा व निष्ठा अधिक, प्रसार अधिक तो शेवटीं विजयी होईल.

आपण गेलों तर जास्तींत जास्त काय होईल? आपला अपमान होईल. सत्यानें अपमानित व्हावयास तयार राहिलें पाहिजे. सत्यदेवाची प्रथम खेटरांनींच पूजा होते. सत्यनारायणाला गाजरपारखी जग प्रथम दगड, धोंडेच मारील आणि मागून पाया पडेल. जगाचा हा कायदा आहे. ही सनातन परंपरा आहे. शंकराचार्यांचा छळ झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकारामांचा छळ झाला. जीवंत असताना छळावयाचें व मेल्यावर त्यांच्या पालख्या नाचवावयाच्या असा सर्वत्र इतिहासांत रक्ताचा नियम आहे.

स्वामींनी जावयाचें ठरविलें. त्यांनी चिटणीसांस पत्र लिहिलें. नामदेव व रघुनाथ यांसहि पत्र लिहिलें. नामदेव व रघुनाथ यांना अपार आनंद झाला. त्यांनी खोली स्वच्छ करुन ठेवली. घोंगडी वगैरे नीट घालून ठेवली. स्वयंपाक करून ठेवला. दोघे मित्र स्टेशनवर गेले. उतरले. स्वामी उतरले. तिघांची दृष्टादृष्ट झाली. तोंडावरचे आविर्भाव बालले. डोळे बोलले. हात हातात घेऊन बोललें. त्यांची सारीं अंगप्रत्यंगे जणु बोलत होती. जणु शरिराला सहस्त्र जिभा फुटल्या होत्या. मुक्या, रसाळ स्नेहाळ जिभा फुटल्या होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel