एरंडोल हें खानदेशांत सुप्रसिद्ध आहे. अति प्राचीन असें हें गांव आहे. महाराष्ट्रांत इतकीं जुनीं गांवें क्वचितच असतील. प्राचीन काळीं १५०० वर्षापूर्वी दिग्विजयी समुद्रगुप्तानें महाराष्ट्रांत मी एरंडपल्ली जिंकलें असें आपल्या विजयस्तंभावरील दिग्विजयाच्या यादींत लिहिलें आहे. एरंडोलला पांडवांचा वाडा अद्याप दाखवतात. आज त्यांत मशीद आहे. ज्या एकचक्रा नगरीत पांडव भिक्षेक-यांच्या रूपानें एका ब्राह्मणाकडे राहत, ती नगरी एरंडोलच्या जवळच होती असें सांगतात. आणि एरंडोलपासून चारपांच मैलांवर पद्मालय म्हणून निसर्गसुंदर स्थान आहे. तेथें जंगलांत बकासुर राहत असे. तेथेंच भीमानें बकासुरास मारलें. तेथें पांढरे पांढरे ठिपके असलेले दगड आहेत. लोक म्हणतात की हा त्या गाड्यांतील दहींभात आहे. तेथें दगडांत खळगे आहेत. तीं भीमाचीं व बकासुराचीं पाउले आहेत असें म्हणतात.
असें हें प्राचीन शहर आहे. मध्यकाळांतहि एरंडोल भरभराटींत होतें. एरंडोलला कागदीपुरा आहे. येथील कागद नागपूरापासून कोल्हापूरपर्यंत जात असे. येथें किती तरी कागदाचे कारखाने होते. परंतु परदेशी यांत्रिक कागद येउं लागला व येथील हा भरभराटलेला भाग ओस पडला. परंतु पुन्हा उद्योग मिळूं लागला आहे. पुन्हा कागदीपुरा गजबजूं लागला आहे. कागदाला मागणी येत आहे व गरीब मुसलमान बंधुभगिनी काँग्रेसला व महात्माजींच्या ग्रामोद्योगास दुवा देत आहेत.
एरंडोलच्याभोंवतीं जुना तट आहे. गांवांतील पाणी वगैरे वाहून जाण्याची पूर्वी फार सुंदर व्यवस्था होती. गांवाला लागून सुंदर नदी आहे. तिचें नांव अंजनी. अंजनी नदीला पूर्वी बारा महिने पाणी असे. पूर्वी पाऊस जास्त पडे. आतां पाऊस कमी झाला. लोक म्हणतात कीं पाप झालें म्हणून नदींचे पाणी कमी होऊं लागलें. कोणी कोणी दंतकथा सांगतात कीं एकदां एका ऋषीनें आपली छाटी तीरावर वाळत घातली होती. परंतु एकाएकीं पूर आला व छाटी वाहून गेली. ऋषि रागावला. त्यानें नदीला शाप दिला. “तूं फार उन्मत्त आहेस. तुझें पाणी कमी होईल.” त्या वेळेपासून पाणी पळालें. परंतु कोणी विचारवंत म्हणतात, “लहानशा लंगोटीसाठी सर्व जगाचें पाणी बंद करणारा हा क्रोधी ऋषि, त्याची का वाणी खरी होईल? या दंतकथेंत अर्थ नाहीं. जंगले कमी होऊं लागलीं त्यामुळें पाऊस कमी पडूं लागला व म्हणून नदीचें पाणी उन्हाळ्यांत कमी राहूं लागलें.”
अलीकडे पाऊस पुन्हा अधिक पडूं लागला आहे. नदीला पाणी राहूं लागलें. स्वच्छ सुंदर पाणी. बायकांची धुण्याची गर्दी असते. दूरवरच्या बाजूला लोक स्नानास जातात. मुलें डुंबत असतात. गाईगुरे येत असतात. गांवात नदी असली म्हणजे गांवांत चैतन्य असतें.
एरंडोलला जुन्या इमारती आहेत. जुन्या सुंदर मशिदी आहेत. मोठमोठे जुने वाडे आहेत. एके काळचें शहराचें वैभव त्यावरून दिसून येतें. परंतु आज तें भाग्य कोठें आहे? जुन्या वैभवाची पडकी माती फक्त आज आहे. त्या वेळचे देशमुख, देशपांडे आज गरीब झाले आहेत. एके काळीं ज्यांच्याकडे हत्ती झुलत, त्यांना आज खाण्याची पंचाईत पडूं लागली आहे. लक्ष्मी ही चंचल आहे. मनुष्याला गर्व वाटूं नये म्हणून का ती एके ठिकाणी राहत नाहीं? परंतु लक्ष्मी चंचल नसून मनुष्यच चंचल आहे. लक्ष्मी नेहमीं ---- जवळ राहते. ज्या देशांत उद्योग अधिक, संघटना अधिक, सहकार्य अधिक, बुद्धि अधिक, निश्चय अधिक, बंधुभाव अधिक, त्या देशांत संपत्ति राहते. तेथे लक्ष्मी राहते. आळस व विलास आले कीं लक्ष्मी पलायन करूं लागते.