“तूं रहा. बाळाचे, माझे आयुष्य देवानें तुला दिले आहे. जगन्नाथ, देव आपल्या प्रेमाचा आशीर्वाद देत आहे. आपल्या प्रेमावर तो मोहित झाला जणुं ! का त्याला आपलें प्रेम पाहवलें नाही ? काही असो या भरलेल्या चंद्रभागेच्या तीरी, या जयजयकारांत, या महान् यात्रेत मी माझी यात्रा भरल्या ह-दयाने पुरी करीत आहे. जीवन कृतार्थ झाले. तूं फुलवतेस, फळवलेस माझे जीवन. जगन्नाथ, गड्या प्रिया, प्राणा, कोणत्या नावानें तुला हांका मारूं ? भेटूं हे तुला, शेवटची भेटूं दे, घे मला जवळ..घे, घे !”
तिनें जगन्नाथला मिठी मारली. सारे प्राण डोळ्यांत आणून तिनें त्याला पाहिले. तेजस्वी डोळे—आणि ते मिटले. त्याच्या मांडीवर प्रेमा. जगन्नाथ बसला होता. काय करील बिचारा ! प्रथम अश्रूच येत ना ? कांही कडाड गर्जना झाली. तो गोळा आपल्या मस्तकावर पडावा असे त्याला वाटलें. परंतु नाही. त्याचें भाग्य नव्हतें. पाऊस त्यांना स्नान घालीत होता.
परंतु थोड्या वेळाने पाऊस थांबला. आकाशांत चंद्र फुलला. जगन्नाथ जरा शांत झाला. त्याला शांत करायला का त्या पर्जन्यधारा धावत आल्या ? देवानें का त्याच्यासाठी अश्रु ढाळले व पुन्हां आफला शांत मुखचंद्रमा त्याला दाखवला तूंहि शांत हो. रडलास ना ? आतां शांत हो. असे का वरचा तो चंद्रमा सांगत होता ? आणि जगन्नाथ गाणें म्हणू लागला. साश्रुकंप गाणे !
हे जीवन म्हणजे काय
कळेना हाय ।।
षडिघडी म्हणुनिया हे भगवंता स्मरतों मी तव पाय ।। हे. ।।
या जगांत नानपंथ दिसतात
कोठला मार्ग मी घेऊं हे तात
तूं धावत ये मम देवा धरि हात
मी गरिब लेकरूं परम कृपेची प्ररङुवर तूं मम माय ।। हे. ।।
मी उडावया प्रभु बघतों परि पडतों
मी तरावया प्रभु बघतों परि बुडतों
मी जागृत व्हाया बघतों परि निजतों
हा मानवजन्म प्रभुवर सारा हरहर वाया जाय ।। हे. ।।
मोही मी प्रभुजी पडतों फिरफिरूनी
घेईन मन्मना केव्हां जिंकोनी
मन्निश्चय राहिल केव्हां दृढ टिकुनी
ही जिवा लागली हुरहुर संतत झालो अगतिक गाय ।। हे. ।।
आशेची जळुनी झाली राखुंडी
जीवनांत आलों आतां रडकुंडी
जाईन होऊनी का मी पाखंडी
जो श्रद्धा आहे तिळभर तोंवर धावत ये रघुराय ।। हे. ।।
जगन्नाथ धावा करीत होता. असत्यांतून सत्याकडे नेणा-याची तो करूणा भाकीत होता. “हे जीवन म्हणजे काय” हा चरण तो पुन्हां पुन्हां म्हणे. “आशेची जळुनी झाली राखुंडी” हा चरण तो पुन्हां पुन्हां म्हणे.