रामराव इंदूला व दुस-या एका मुलीला सकाळी शिकवायला जात. ते संस्कृत शिकवीत. सोपे सोपे संस्कृतातील श्लोक सांगत. गीता घेत. गणित व इंग्रजीहि सांगत. इंदु प्रेमाने त्यांच्याजवळ शिके. रामरावहि प्रेमाने शिकवीत.
शीघ्रवाचनाचे एक इंग्रजी कथापुस्तक होते. इंदूबरोबर रामराव ते वाचीत. एका लहान मुलाला त्याचे शत्रु दूर एका किल्ल्यांत नेऊन ठेवतात. परंतु त्या मुलाचे पालन करणारा एक विश्वासू सरदार त्याला तेथून गुप्तपणे पळवतो. घोड्यावरून पळवतो. घोड्यावरील सामानांत त्याने त्या मुलाला लपविलेले असते. आतां धोका नाही असे पाहून तो सरदार त्या लहान मुलाला मोकळे करतो. आपल्यासमोर त्याला घेऊन तो घोडा दौडवितो. आणि एके दिवशी ते आपल्या गावाजवळ येतात. त्यांचा उंच वाडा दुरुन दिसतो. मुलगा आपले घर ओळखतो.
“घर, घर, ते आले आपले घर!” तो लहान मुलगा आनंदाने टाळ्या वाजवून म्हणतो.
त्या सरदाराने त्याला धरून ठेवलेले असते म्हणून बरे. नाही तर तो घोड्यावरून पडता. घोड्यावरच नाचू लागता.
“होय हो बाळ. घर, गोड घर! आले तुझे घर.” सरदार म्हणतो. ते वर्णन वाचताना रामरावांचे डोळे भरून आले.
“तुम्ही रडतासे?” इंदूने विचारले.
“कां बरे हे पाणी आले? तूंच सांग.” ते म्हणाले.
“तुम्हांला का घरची आठवण झाली? तुमच्या एरंडोलच्या घरची आठवण झाली?”
“होय बाळ. ती आठवण कधी जात नाही. रोज माझ्या डोळ्यांसमोर एरंडोल असते. ते पूर्वजांचे घर असते. त्या शेकडो आठवणी असतात.”
“तुम्हांला सुद्धां अजून ते घर आठवते?”
“तुम्हांला म्हणजे?”
“या गोष्टींतील मुलगा लहान आहे. तुम्ही तर कितीतरी मोठे आहांत, मोठ्यांना सुद्धा असे वाईट वाटते?”