“तुम्हांला ते हरण आवडले?”
“हो आवडले. जणु मृगजलाकडे धांवत आहे!”
“मला त्यांत बक्षीस मिळाले होते.”
“तुम्हांला सर्वच कामांत बक्षिसे मिळतात वाटते?”
हो. आळसातसुद्धा बक्षिस मिळते. आई पाठीवर देते थप्पड.”
“परंतु हळूच ना?”
“कशावरून हो?”
“मला माझी आई हळूच मारी. कारण मी एकुलता एक ना!”
“मीहि एकुलती. तुमचे नांव दोन अक्षरी व माझेहि. तुम्हांला संगीत आवडते. मलाहि आवडते. मला आवडलेला हा हार तुम्हांलाहि आवडला. आपले दोघांचे सारखे आहे नाही?ठ
“परंतु मी गरीब आहे.”
“आम्ही का श्रीमंत आहोत? फार नाही काही. आणि तुम्ही एके काळी श्रीमंत होतेतच. मला श्रीमंती नाही आवडत. मला दागदागिने मुळी नाही आवडत. फुले मात्र आवडतात.”
“आमच्या तिकडे पद्मालय आहे. त्याच्या जंगलात फार रानफुले आणि मोरांची पिसे सापडायची. मी व माझा मित्र गोळा करीत असूं, एकमेकांच्या कानांत घालीत असूं!”
“एकाद्या सुटीत बाबांबरोबर आपण जाऊ सारी.”
“परंतु आम्ही अज्ञातवासांत आहोत.”
“अज्ञातवास संपणार नाही कधी?”
“मी श्रीमंत होईन तेव्हा संपेल. मग मान वर करून एरंडोलला जाईन.”
“मान वर का श्रीमंतीनेच होते?”