वर्ग संपला. जगन्नाथ वर गेला. आता रात्र होऊ लागली.
“झाला का संगीताचा वर्ग?” कावेरीने येऊन विचारले.
“हो झाला. तुम्ही कोठे गेला होता?”
“सायंकाळी हिंदीचा वर्ग घेता मुलींसाठी. आणि आता रात्री हरिजन वस्तीत स्त्रियांना शिकवते. तुम्ही याल रात्रीच्या शाळेत?”
“मी कशाला?”
“भेट द्यायला, शेरा माराय़ला.”
“मला काही समजणार नाही.”
“तुम्ही वंदे मातरम् गाणे म्हणा. त्यांना समजेल. देशांत एक तरी गाणे जन्मले आहे की जे सर्वत्र गेले आहे, सर्वांच्या हृदयांना जे नाचविते.”
“आणि इन्किलाब जिन्दाबाद?”
“तेहि मी त्यांना शिकवले आहे. परंतु आज वंदे मातरम् म्हणा. या हं. आपण जाऊ जेवल्यानंतर. आमच्याकडचे जेवण तुम्हांला आवडते का?”
“जरा तिखट लागते. तुमच्यांत आंबट व तिखट फार. लोक आतां जरा आंबट व तिखटच व्हायला हवेत. गुळमुळित गोड गोड नकोत. अहो दुधांत किती गोड मुरवण टाका तरी दही होत नाही. परंतु आंबट दह्याचे नुसते बोट पुरेसे होते. खरे ना? तुमच्यासाठी कमी तिखटाचे करूं.”
“मी खाणावळीतच जाईन.”
“का बरे?”
“तुमच्याकडे कसे जेवायचे?”
“तुम्ही पैसे द्या. मोफत नका जेऊं.”
“पैसे देईनच. परंतु तुम्ही सारे प्रेमाने करतां, त्याची किंमत का पैशाने देतां येईल? माझ्यासाठी उगीच कष्ट!”
“असे नका बा मनांत आणूं. मद्रासकडचे लोक प्रेमळ आहेत, उदार आहेत, पाहुण्यांना घरच्यांसारखे वागवतात, असे तुम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगा. कितीतरी मद्रासी बंधु तुमच्या मुंबई पुण्यास गेले आहेत, नागपूरपर्यंत गेले आहेत.”