असे तो मित्रासमोर म्हणत होता. वेदनांतून जन्मलेले सहज गीत!
जगन्नाथ घरांत कोणाजवळ बोलेना, तो ना नीट खाई, ना नीट पिई. वैतागल्यासारखा वागे. त्याचे कशात जणुं लक्ष लागेना. आईबापांच्या लक्षांत ही गोष्ट आली. शेवटी पंढरीशेटनीं एके दिवशी जगन्नाथला सांगितले.
“जगन्नाथ, जा हो बाळ तू. तुला जिकडे जायचे असेल तिकडे जा. मी पुष्कळ विचार केला. तुझे म्हणणे खरे आहे. जा, तीन चार वर्षे हिंडून ये. काय तुला शिकायचे ते शिकून ये. तुझी बायको आमच्याजवळ राहील. पुढे जाणार असलास तर आजच जा. आम्ही मेल्यावर पत्नी सोडून गेलास तर तिला कुणाचा आधार? अजून आम्ही जिवंत आहोत. तिचा सांभाळ करू. माहेरी आता तिला थोडीच ठेवायची! येथे आणले पाहिजे. परंतुु तू जा. मी रागावून नाही सांगत. मनापासून सांगत आहे.”
“बाबा, तुमचे प्रेम आहे ना, आशीर्वाद आहे ना?”
“होय, आहे. एकच इच्छा आमची की तू सुखी हो. घरांत तुला सुख नसेल वाटत, आमच्या संगतीत नसेल वाटत, म्हाता-या आईबापांजवळ रहावे असे नसेल वाटत तर जेथे तुला सुख होईल तेथए जा. कोठूनहि तू सुखी हो.”
“बाबा, असे का बोलता? मला का तुमचा कंटाळा आहे? तसे असते तर तुमचा आशीर्वाद मी का मागितला एसता? तुमच्यावरहि माझे प्रेम आहे, भक्ति आहे. परंतु मला जरा शिकूनसवरून येऊ दे. तुमचे नांव उजळ करण्यासाठीच मी जात आहे. माझ्या हृदयाच्या, मनाच्या भुका आहेत. त्या थोड्या तृप्त करून येऊ दे हो बाबा.”
“ये हो बाळ. ये. चांगला हो. सुखी हो.”
“मी तुम्हांला पत्र पाठवीन. तुम्ही हाक मारतांच परत येईन.”
“बरे हो. तू आनंदी हो. प्रसन्न हो. माझा जगन्नाथ दु:खी दिसता कामा नये. हीच एक तुझ्या वृद्ध पित्याची इच्छा आहे.”
“तुमच्या प्रेमाने ल आशीर्वादाने नाही होणार दु:खी. मी सुखी होईन व दुस-याचेहि संसार सुखी करण्यासाठी झटेन.”