एके दिवशी गुणा क्षितिमोहनांकडे गेला होता.
“संगीताची भोक्ती गेली.” ते म्हणाले.
“संगीताने बरी होण्याऐवजी तिला मरण आले.”
“परंतु कसे शांत समाधानी मरण!”
“कुमुदिनीचा तो फोटो मला द्या. त्या दिवशी येथेच राहिला. तो मागायला मी आलो आहे.”
“न्या. तुमचाच त्या फोटोवर हक्क आहे.”
क्षितिमोहनांनी तो फोटो दिला. त्यांना काही बोलवले नाही.
“जातो मी.”
“या.”
गुणा कुमुदिनीचा फोटो घेऊन आला. त्याने तो ट्रंकेत ठेवला. इंदूला हा फोटो पाहून मत्सर वाटेल का? ती रागावेल का? नाही. तिला मत्सर वाटणार नाही. ती या पवित्र फोटोची पूजा करील. या जगांत किती दु:खे, किती ओढाताणी! हे जग अपूर्ण आहे. या जगांत गुंतागुंती फार. असा कसा तो देव? तो दयाळू आहे का हृदये कुसकरणारा आहे? कां असे प्रेमबंधन तो लावतो? अनुदार कठोर देव! मानवी भावनांचे खेळ करणारा, मानवी आशाआकांक्षांची फुले कुसकरून हंसणारा—सुलतानी देव!
गुणाच्या मनावर त्या मरणाचा खोल ठसा उमटला. तो दिवाळीचे सुटींत इंदूरला गेला नाही.
परंतु मनोहरपंतांनीं त्याला नाताळचे सुटीत बोलावलेच. तो गेला इंदूरसा आला. सर्वांना आनंद झाला. इंदूच्या घरींच तो उतरला. जणुं इंदूचाच तो झाला होता. तिच्यासाठी आला होता.
“बरी आहेस ना इंदु?”
“गुणा, तू बरा आहेस ना? तूं दूर होतास. एकटा होतास.”