एकदा तिचा भाऊ एरंडोलला आला होता. बहिणीची दशा पाहून त्याला वाईट वाटले.
“अंबु, माहेरी येतेस काहीं दिवस?”
“आईबाप ज्यांचे आहेत त्यांना माहेर.”
“असे का बरे म्हणतेस?”
“आजपर्यंत नाही आलास तो?”
“परंतु आज तरी आलो ना? चल काही दिवस. तोपर्यंत कदाचित् ते येतील.”
इंदिरा माहेरी गेली. दागदागिने अंगावर न घालतां गेली. सासूने सांगितले नाही. तिने मागितले नाहीत. तिचे त्या दागिन्यांकडे लक्षहि नव्हते. मात्र जगन्नाथचा फोटो बरोबर होता. तो एक अमोल अलंकार तिच्या ट्रंकेत होता. बरोबर चरखा होता. शिरपूरला अंबु आली. तिला अंबु नाव आवडे. तिच्या मनात येत असे की आपण आपल्या पतीला हे नाव सांगू. परंतु तिला ती संधि कधी येणार होती?
माहेरी आली तरी तिला आनंद नव्हता. तिचे भाऊ दिवसभर बाहेर असत. त्यांच्या उद्योगधंद्यांत असत. शेंगा, कपाशीच्या बाजारात असत. अंबूजवळ कोण बोलणार? तिला अंबु हाक कोण मारणार? भावजया बोलत नसत. अंबु आपलें लुगडे आपल्या हातांनी धुवी. घरांतीलहि काही काम करू लागे. परंतु भावजयांचा तिच्यावर बहिष्कार असे.
“तुम्ही आपल्या नुसत्या जेवत जा. कशाला हात नका लावीत जाऊं. माहेरी काम नको.” मोठी भावजय म्हणाली.
“पण मी करीत का नाही काम?”
“तुम्ही करतां परंतु आम्हांलाच ते नको. तुम्ही त्या आश्रमांत होत्यात. वाटेल त्याच्या हातचे खाल्ले असाल. सारा भ्रष्टाचार. तुमच्या सासरी चालत असेल. येथे नको. आपल्या वर खोलीत बसत जा, चरखा फिरवीत जा, जेवायला खाली येत जा.”
‘बरं हो वैनी, तुमची इच्छा तशी वागेन.”
अंबु वरती बसे, फोटोसमोर बसे. फोटोला स्वत:च्या हातच्या सुताचा हार तिने घातला होता. फुलांचा हार तरी कशाला? भावजया बोलायच्या एखादवेळ.
एके दिवशी भावजयांचे पुढील बोल तिच्या कानांवर आले.