“अंबु!”
तिने उत्तर दिले नाही. तिने डोळे पुसले. ती गंभीर झाली.
“काय भाऊ?”
“तुला आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे. बघ पत्र. तुझ्या नावचे. त्यांचेच असेल बहुधा. बरेच शिक्के पडले आहेत.”
अंबूने पत्र हाती घेतले. ते अक्षर तिने ओळखले. तिची चर्या फुलली, डोळे हसले.
“होय भाऊ, त्यांचेच पत्र.”
“बरो झाले. येतील आता तेहि. पत्र आले, पाठोपाठ तेहि येतील. अंबु, अशी रडतच नको जाऊ. मी जातो हं.”
भाऊ निघून गेला. अंबूने ते पत्र कितीतरी वेळ हातांतच ठेवले. शेवटी तिने हलक्या हातांनी ते फोडले. जगन्नाथचे ते पत्र आले होते. जगन्नाथ लौकरच येणार होता. वर्ध्याचा आश्रम बंद झाल्याचे तेथील व्यवस्थापकांकडून त्याला कळले होते. मग त्याने घरी एरंडोलला विचारले होते की इंदिरा कोठे आहे. ती माहेरी आहे असे कळल्यावरून त्याने इकडे पत्र लिहिले होते. ही सारी हकीगत त्या पत्रांत होती. मध्यंतरी बरेच दिवस पत्र कां लिहितां आले नाही त्याचीहि हकीगत होती. अंबु पत्र वाचतां वाचतां मध्येच थांबे. जणु लौकर संपेल वाचून म्हणून का थांबे? पुरवून पुरवून का ती वाचीत होती?
ते पत्र म्हणजे आशा होती, नवजीवन होतें, अमृत होते. भावजयांची बोलणी ती विसरून गेली. त्या सा-या हृदयाच्या जखमा भरून आल्या. ती आनंदाने ओसंडून गेली. तिने तो फोटो काढून घेतला व हृदयाशी धरला.
“कठोरा, आली दया एकदांची!” असे त्याला म्हणाली. परंतु पुन्हा म्हणाली, “नाही हो, कठोर नाही हो तुम्ही. प्रेमळ आहांत. गरिबांच्या दु:खाने दु:खी होणारे आहांत. गमतीने मी कठोर म्हटले हो. रागवूं नका हो.” तिने तो फोटो पुन्हा ठेवून दिला.
ती आपल्या सुताच्या गुंड्या मोजूं लागली. भरपूर होत्या. आता लौकर एरंडोलला जाऊ व कासोद्याच्या खादीकेन्द्रांतून विणून आणू. छान होईल धोतरजोडा. शर्टससुद्धां होतील. माझ्या हातच्या सुताचे कापड. त्यांना आवडेल. ते मला काय आणतील? तेहि आणतील का त्यांच्या हातच्या सुताचे पातळ? परंतु त्यांना नसेल वेळ झाला. आणि मध्येच तो तुरुंगवास! आम्हांला कळलेहि नाही. सुखरूप येवोत म्हणजे झाले. लिहितात की प्रकृति चांगली आहे. परंतु तुरुंगात राहून का चांगली असेल प्रकृति?
अंबु अशा विचारांत होती. एरंडोलला आता जावे असे तिने ठरविले. ती भावाजवळ त्याप्रमाणे दुस-या दिवशी बोलली.