“तुम्ही फार अडचणीत आहांत, संकटांत आहांत.”
“हो.”
“म्हणून तुम्हांला मघाशीं वाईट वाटत होते, होय ना?”
“म्हणून नाही. मला माझ्या मित्राची आठवण झाली. आम्ही आमचे गांव गुपचूप सोडले. माझ्या मित्रालाही मी कळवले नाही. बाबा म्हणाले, कोणाला सांगू नको. माझा मित्र फार सुंदर गातो. मी त्याची साथ करतो. आम्ही एकमेकांना कधी विसंबत नसू. लहानपणापासून मित्र! आज बारा वर्षे आम्ही एकत्र उठलो बसलो, खेळलो हसलो, रडलो रागावलो, त्याला माझी आठवण येत असेल! तो रडेल, दु:खी होईल, मलाहि त्याची आठवण येऊन वाईट वाटले.”
आणि सांगता सांगता गुणा सद्गदित झाला. तो सदगृहस्थहि जरा विरघळला. तो खानदानी दिसत होता, मोठ्या घराण्यांतील दिसत होता. तोंडावर सौजन्य व सत्संस्कार दिसत होते. ज्याला पाहतांच आदर वाटेल असा तो होता.
“तुम्ही शाळेत नाही शिकलेत?”
“शाळेत जात होतो परंतु आता कुठली शाळा? अपुरेच राहिले शिक्षण. परंतु मला वाईट नाही वाटत! ही एक कला मजजवळ आहे, पुरे आहे तेवढी. आणखी काय पाहिजे?ठ
“तुम्ही इंदूरला याल?”
“तेथे येऊन काय करायचे?”
“इंदूर रसिकांचे माहेरघर, संगिताचे स्थान. तिकडे याल तर अडचण पडणार नाही. मी इंदूरला राहतो, माझे घरच आहे तेथे. तुम्ही या, तुमची काही व्यवस्था करता येईल. माझ्या मुलीला तुम्ही वाजवायला शिकवा. आजपर्यंत मी पुष्कळ वेळा सारंगी ऐकली, परंतु तुमच्या बोटांत काही विलक्षण जादू आहे यांत शंका नाही. या तुम्ही, तेथे बरेच जहागीरदार, इनामदार, सरदार, दरकदार अद्याप नांदत आहेत. त्यांच्यातून शिकवण्या मिळतील. २०।२५ रुपये कमीत कमी. राहता येईल लहानशी खोली घेऊन. इंदूरला वाटले तर तुम्हांला शिकताहि येईल. तुमचे कोठपर्यंत शिक्षण झाले?”