“आम्ही एरंडोलला येऊ. जगन्नाथ परत येईल. आशेने रहा. असे लिहा.”
“आणि गुणाने तसे पत्र लिहिले. गुणा येणार येणार असे एरंडोलात झाले. गुणा येणार, मग जगन्नाथहि येणार असे लोक म्हणत. जगन्नाथच्या वडिलांना धीर आला. आईला धीर आला. इंदिरेच्या आशेला पल्लव फुटले.
“आपण सारीच आतां परत जाऊं इंदूरला.” मनोहरपंत म्हणाले.
“येथे आता पावसाळाहि सुरू होईल.” गुणा म्हणाला.
“आतां मी बरी झाल्ये. काही सुद्धां होणार नाही आतां. मी डोंगर चढेन, दरीखोरी उतरेन.” इंदु म्हणाली.
“कार्ल्याची लेणी पाहतां पाहतां दमलीस.” आई म्हणाली.
“गुणा येण्याच्या पूर्वीची ती गोष्ट. गुणा आल्यापासून बघ वजन किती वाढले. मी राक्षसीण होईन की काय असे भय वाटूं लागले आहे.”
“राक्षसीणी का वाईट दिसतात? शूर्पणखा फार सुंदर होती.” गुणा हंसून म्हणाला.
“राक्षसांतील ते सौंदर्य. ते राक्षसांना आवडेल.” इंदु म्हणाली.
शेवटी सारी इंदूरला परत आली.
इंदूरचे घर पुन्हा गजबजले.
रामराव, गुणा, त्याची आई पुन्हा दुस-या एका ठिकाणी रहायला गेली.
“किती दिवस तुम्ही दूर राहणार?” इंदुने विचारले.
“आणखी काही दिवस. मी आतां जाणार आहे कलकत्त्यास. एक वर्षाचा कोर्स आहे. तो शिकून येईन.” गुणा म्हणाला.
“लौकर या. नाहींतर मी पुन्हां आजारी पडेन हो! तुमची हवा जवळ असली म्हणजे मी बरी राहीन.”
“मला अलीकडे तूंच्या ऐवजीं तुम्ही का म्हणतेस?”