मनोहरपंत बाजारांत गेले. इंदूने दिवाणखान्यांत स्वत: झाडलोट केली. अभ्रे नवीन घातले. लेड-तक्के नीट लावून ठेवले. तसबिरीवरून फडका मारला. कृत्रिम फुलांचे फुलदान ठेवून दिले. पानसुपारीचे ताट नीट पुसून ठेवले. सारे कसे शुभ्र, मंगल दिसत होते. पवित्र, प्रसन्न दिसत होते. जणुं दिवाणखान्यांतील सर्व वस्तूंवर आनंदामृताचें सिंचन केले होते.
इंदु आपल्या खोलीत सुताचा हार गुंफीत बसली. त्याच्या निरनिराळ्या गांठी मारून एक मनोहर हार तिने तयार केला. तिने तो स्वत:च्या गळ्यांत घालून पाहिला. ती आरशांत पहात होती. तो मनोहरपंत फुले घेऊन आले.
“हे ग काय? स्वत:च्या गळ्यांत का घालतेस?”
“कसा दिसतो तो पहात आहे.”
“तुला चांगला दिसला म्हणजे त्यांना दिसेल वाटते?”
“हो. कारण ते माझ्यासारखेच आहेत. होय ना? त्यांचे नाव दोन अक्षरांचे, माझे दोन अक्षरांचे. त्यांना गाणे आवडते, मला आवडते. ते आईबापांचे एकुलते, मीहि एकुलती. मग मला जे चांगले दिसेल ते त्यांनाहि चांगले दिसेल. आणा ती फुले. या सुताच्या मध्यभागी एक घालते. गुलाबाचे फूल छान दिसेल.”
इंदूने फूल हारांत गुंफले. तिने स्वत: केसांत फुले घातली. ती तयार झाली. केव्हा दहा वाजतात याची ती वाट पहात होती.
“चल इंदु, खाली मोटार आली आहे. विश्वासरावांनी दिली आहे. त्यांना मोटारींतून आणूं. इंदूरचा संस्थानी थाट त्यांना दाखवूं. दिपवून टाकू त्यांना.”
“बाबा, त्यांना थट्टा वाटेल. म्हणतील भिकरा-यांना इतका का मान देतात?”
“परंतु ती मंडळी मानधन आहेत. तसे त्यांना वाटणार नाही.”
“चला बाबा.”
इंदु व मनोहरपंत मोटारींतून स्टेशनवर आली. हातांत हार घेऊन इंदु प्लॅटफॉर्मवर उभी होती. मनोहरपंत प्लॅटफॉर्म तिकिटे घेऊन आले. इंदु गाडीची वाट पहात होती. आली गाडी. घंटा झाली.
“बाबा, तुम्हीच घाला हार. हा घ्या.”
“तुझ्याच असू दे ग हातांत. जरा धीट हो. सा-या मुलखाची तू लाजरी व बुजरी.”
गाडी आली. गुणाचे तोंड बाहेर होते. त्याने खूण केली. इंदूने गुणाला पाहिले. त्यानेहि पाहिले. गाडी थांबली. मनोहरपंत व इंदु डब्याजवळ गेली. रामराव व गुणाची आई खाली आली. हमाल सामान काढूं लागला. गुणा देऊ लागला.