“बरं जा पळून. आता लग्न तर होऊ दे. पुढचे पुढे.”
जगन्नाथचे लग्न कसे एकदा निर्विघ्न पार पडते हा प्रश्नच होता. हा हट्ट करील, ऐकणार नाही, असे वाटत होते. परंतु एकदा काही झाले तरी लग्न उरकून घेतलेच पाहिजे असे पंढरीशेट म्हणत आणि सर्वांना ते पटे.
एके दिवशी गुणा व जगन्नाथ बसले होते. त्यांच्या याच गोष्टी चालल्या होत्या.
“गुणा, तूं आले पाहिजे हो. नाही तर बघ.”
“मी नको रे. तेथे कोण माझ्या ओळखीचे? सारे श्रीमंत लोक जमणार. तेथे माझी फजिती होईल.”
“काही नाही फजिती. तू नेहमी माझ्याजवळ अस.”
“अरे तू का तेथे मोकळा असशील! बायका तुला घेरतील. भटजी तुला घाबरवतील. सतराशे प्रकर सुरू असायचे. मी कुठे असेन तुझ्याबरोबर?”
“गुणा, असे काय बरे? मला वाईट वाटेल.”
“जगन्नाथ, तुझ्या लग्नांत का अशा कपड्यांनी येऊं?”
“मी तुला चांगले कपडे हेईन. माझ्या लग्नाची भेट मान. प्रेमाची भेट.”
“लोक मला हसतील. लग्नात वास्तविक दुस-यांनी भेट द्यायची असते. मी तुला काही तरी द्यायला हवे. काय देऊ मी? काय आहे माझ्याजवळ? जगन्नाथ, तू कशाला झालास माझा मित्र?”
“तुला हंसवण्यासाठी, तुझ्या जीवनांत आशा व आनंद ओतण्यासाठी. गुणा, तू व मी का परके आहोत? इतर काही म्हणोत. तू माझ्याकडे बघ. माझे प्रेम ओळख आणि मी देईन ते घे. खादीचे सुंदर कपडे मी तुला देईन. आपण दोघे बरोबर जळगावच्या खादीभांडारात जाऊ. तेथे नाना प्रकारचा माल असतो. आपण दोघे ठरवू. तुला मला सारख्याच प्रकारचे.”