जगन्नाथ गुणाकडे निघाला. गुणा एकटाच घरी बसला होता. तो सांरंगी वाडवीत होता. तींत तल्लीन झाला होता. पाठीमागून हळूच जगन्नाथ आला. त्यानें गुणाचे डोळे धरले.
“जगन्नाथ, सोड डोळे. मीं ओळखलें. हे तुझेच हात. श्रीमंती हात, फुलांसारखे हात, परंतु आंगठ्या असल्यामुळें बोंचणारे, खुपणारे हात. सोड ना जगन्नाथ. ह्या आंगठ्या का डोळ्यांत खुपतोस?”
जगन्नाथानें हात सोडले. तो म्हणाला, “गुणा, ती सारंगी आधीं खालीं ठेव. माझ्या प्रश्नाचें उत्तर दे. आज तूं कां नाही आलास माझ्याकडे? आज दसरा. आज तर तूं आधी आला पाहिजे होतास. उजाडतांच मित्राला प्रेमाचें सोनें द्यावयास.”
“जगन्नाथ, सोन्यानें तर तूं नटला आहेस, आणखी सोनें काय करायचें? शब्दांचें सोनें?”
“मला हें सोनें खरेंच नको वाटतें. परंतु आईसाठीं सारें करावें लागतें. तूं कां आला नाहींस सांग?”
“आई म्हणाली, आज जाऊं नकोस.”
“कां बरें? तुझ्या आईला का मी आवडत नाहीं?”
“तसं नाहीं रे. परंतु म्हणाली नको म्हणून.”
“गुणा, तूं असेंच करतोस. सणावाराच्या दिवशींच नेमकें तुला भूत कां आठवतें?”
“जगन्नाथ, माझ्या अंगावर बघ, नीट सदरासुद्धां नाहीं. तुझ्याकडे आलों तर तुझ्या घरची मंडळी हसतील. तुझे कपडे बघ, आणि माझ्या ह्या चिंध्या! आई म्हणाली, ‘बाळ, आपण गरीब आहोंत. गरीबानें घरांत बसावें व फाटलेली अब्रू सांभाळावी.’ आईला रडूं आलें. सणावारीं मुलाला नवीन सदरा करतां आला नाहीं म्हणून तिला वाईट वाटलें. मीहि दु:खी झालों. येथें येऊन वाजवीत बसलों. बाबांनी ही कला तरी मला मिळण्याची व्यवस्था केली. सारें दु:ख विसरण्याची कला!”
“तुझ्या अंगांत सदराहि नाहीं, मग तुला सारंगी शिकविण्यासाठी शिक्षक रे कशाला?”
“बाबांनीं मला विचारलें. तुला नवीन कपडे पाहिजे असतील तर वाजवायला शिकणें बंद. मी त्यांना म्हटलें, मला एकच सदरा पुरे. घरीं उघडा राहीन. शाळेंत जातांना सदरा घालीन; परंतु मला वादन शिकूं दे.”