“असे नाही. परंतु आमचे घर आम्हांला पुन्हा घेतां येईल. त्यांत स्वाभिमानाने राहतां येईल.”
“मी आता जाते. तुम्हांला बल्ब आणावे लागतील. मालकाला सांगावे लागेल. नाहीतर आमच्याकडचे दोन पाठवते रामाबरोबर. आहेत शिल्लक.”
“परंतु आम्ही कंदीलावरच भागवू.”
“कंदील नको मिणमिण करणारे. हा तुमच्या मित्राचा फोटो विजेच्या दिव्यांत छान दिसेल. मी देतेच पाठवून बल्ब. नाहीतर मीच घेऊन येते.”
इंदु पळतच जणुं गेली.
“किती मोकळी आहे मुलगी. जणुं पूर्वीची जुनी ओळखच आहे अशा रीतीने बोलत होती.” रामराव म्हणाले.
“जणुं आम्ही तिचीच कोणी” गुणाची आई म्हणाली. थोड्या वेळाने इंदु बल्ब घेऊन आली.
“तुम्ही कशाला आलांत?”
“रामा गेला होता बाहेर. आल्ये पळत मीच.”
“आणा मी लावतो.”
“झटका बसेल हो. तुमच्या एरंडोलला आहेत का दिवे?”
“दिवे आहेत तर?”
“दिवे म्हणजे विजेचे?”
“विजेचे नाहीत. परंतु मला माहीत आहे सारे.”
गुणाने बल्ब लावले. स्वयंपाकघर व बैठकीची खोली यांच्यामधील दारांत एक लावला व एक स्वत:च्या खोलीत त्याने लावला. जगन्नाथच्या फोटोवर.
“आता येथे टेबल खुर्ची हवी. म्हणजे तुम्हांला वाचायला दिसेल. नाही तर इतक्या उंचीवरून कसे दिसेल?”
“त्याला जोड घेऊं.”