प्रिय हा खानदेश माझा।।
काय उणे त्या
काय कमी त्या
भाग्यशाली राजा।।प्रिय.।।
म्लान न होई
दीन न होई
सतत हरित ताजा।।प्रिय.।।
सदा अंतरी
एक हा धरी
राष्ट्रभक्तिकाजा।।प्रिय.।।
गुणा गाणे आळवीत होता. मधूनमधून तो हळूच गाण्याचे चरण गुणगुणे. पाळधी स्टेशन आले. त्याने सारंगी बंद केली. आता पुढे जळगावच येणार. पाळधी सोडून गाडी निघाली. गिरणेचा भव्य पूल लागला. आता गिरणा पुन्हा थेडीच दिसणार होती! सदैव गुणगुणणारी ती गिरणा! जिच्या काठची टरबुजे, खरबुजे, गूळभेल्या, साखरपेट्या अधिक गोड लागतात, ती ही गिरणा! गिरणेचा पूल संपला व एरंडोल तालुक्याची हद्द संपली. जळगाव आले.
सारी मंडळी खाली उतरली. तिघांनी थोडे खाल्ले. पुन्हा गाडी दोन तासांनी होती, मुंबईकडे जाणारी गाडी!
“बाबा, कोठे जायचे?”
“आधी नाशिकला जाऊ.”
“तेथे उतरायचे कोठे?”
“उतरू एखाद्या धर्मशाळेत.”
रामरावांनी तिकिटे काढली. गाडी आली. गाडीत फारच गर्दी होती. कसे तरी एका डब्यांत सारे सामान कोंबून तिघे एकदाची वर चढली; परंतु बसायला जागा नव्हती. तेथे दाराच्या तोंडाशी रामराव, गुणा व गुणाची आई उभी होती. गाद्या पसरून काही लोक बसलेले होते; दिवस होता तरीहि काही झोपलेले होते. कदाचित् रात्री ते असेच उभे असतील. आता जागा मिळाली म्हणून ते झोपले असतील.