जगन्नाथने दक्षिणेची यात्रा सुरू केली. संगीताचा अभ्यास कोठे होईल याची यौकशी करीत ते निघाला. तो कांचीवरम् येथे गेला. तेथे एक प्रख्यात संगीत विद्यालय होते. त्यागराज या प्रसिद्ध संगीताचार्यांची परंपरा चालविणारे ते विद्यालय होते. त्यागराज म्हणजे दक्षिणेकडील तानसेन. त्यागराजांची कीर्ति तानसेनापेक्षाहि अधिक आहे. तानसेन उत्कृष्ट गाणारा होता. परंतु त्यागराज उत्कृष्ट गीतेहि रटीत. ते कविहि होते व गाणारेहि होते. कवीची प्रतिभा व गायनाची कला या दोहोंचे मधुर मिश्रण त्यांच्या ठिकाणी झाले होते. त्यागराजांची गीते दक्षिणेकडे सर्वश्रुत आहेत.
जगन्नाथला तामीळ भाषा येत नव्हती. तो मोडके तोडके हिंदी, संस्कृत, इंग्रजी या तिन्ही भाषांच्या साहाय्याने आपले काम भागवीत होता. एका खाणावळीत तो उतरला. खाणावळवाला इंग्रजी जाणणारा होता. तेथे सामान ठेवून जगन्नाथ त्या संगीत विद्यालयाचा पत्ता काढीत गेला.
विद्यालयाचे चालक तेथेच रहात असत. पशुपति त्यांचे नाव. जगन्नाथने त्यांच्याशी बोलणे सुरू केले. परंतु ते एकदम हिंदीत बोलू लागले. जगन्नाथला आश्चर्य वाटले. जगन्नाथला हिंदी नीट बोलता येईना. परंतु पशुपति छान बोलत होते.
“तुम्हांला हिंदी येते?”
“मी हिंदी प्रचारिणी सभेचा सभासद आहे. मी सर्व परीक्षा दिल्या आहेत. माझ्या मुलीने सुद्धा परीक्षा हिली आहे. तुम्हांला नाही वाटते येत हिंदी?”
“मला बोललेले समजते, परंतु नीट बोलता येत नाही. हिंदी वर्गात मी कधी गेलो नाही.”
“हिंदुस्थानची यात्रा करूं इच्छिणा-याने हिंदी आत्मसात् केली पाहिदे. आज राष्ट्र एक होऊ पहात आहे. अशा वेळेस परस्परांची हृदये एकजीव होण्यासाठी राष्ट्रभाषाहि एक हवी.”
“हिंदुस्थानची एकता अनुभवण्यासाठीच मी निघालो आहे. दक्षिणेकडचा आत्मा समजून घेण्यासाठीच आलो आहे. दक्षिणेकडचे संगीत शिकण्यासाठी आलो आहे. आपल्या संस्थेत मी शिकू इच्छितो.”
“तुम्ही गायन शिकलेले आहांत का?”
“थोडा फार अभ्यास तिकडे महाराष्ट्रांत झाला आहे.”