अनुदार आहे देव
इंदु अकस्मात् आजारी पडली. तिला ताप म्हणून येऊ लागला. परंतु तो ताप निघेना. तो दोषी ताप नव्हता. तो कधी जास्त तर कधीं कमी असे. एखादे वेळेस निघे. परंतु पुन्हा येई.
“गुणा, कर ना रे मला बरी.” ती कंटाळून म्हणे.
“मला तुझे दुखणे घेता आले असते तर!”
“तू ते सहन केले असतेस?”
“पुरुष अधिक बलवान् असतात.”
“परंतु बायका अधिक सहनशील असतात. गुणा, मी या दुखण्यांतून बरी नाही होणार.”
“होशील बरी. काही तरी मनाला लावून नको घेऊं.”
“कोणी म्हणतात क्षय होईल.”
“म्हणूं देत.”
“तूं नको माझ्याजवळ बसत जाऊं. क्षय स्पर्शजन्य आहे.”
“प्रेमसुद्धा स्पर्शजन्य आहे. म्हणून प्रेमापासून का आपण दूर राहतो?”
“गुणा, तू माझ्याकडे नको येत जाऊ.”
“का पण?”
“मी अशी क्षयी. क्षयी माणसे कायमची बरी नाही हो होत.”
“परंतु तुला क्षय नाही. कितीदां सांगू?”
“इतर डॉक्टरांपेक्षा का तू मोठा?”
“हो. माझे मन सांगते की, तू बरी होशील.”
“आपल्या मनाप्रमाणे या जगांत झाले असते तर किती छान झाले असते!”
“तू पडून रहा. मी जातो हं.”
गुणा गेला.