“आमच्या तालुक्यांतील शेतक-यांत ते हिंडत. त्यांची मला फारशी माहिती नाही. ते अवलियासारखे वागत. परंतु गरिबांवरच्या अन्यायाने त्यांच्या मनाची होळी होई. सरकारने त्यांना हद्दपार केले आहे. त्यांच्या शिकवणीचा आम्हां दोघां मित्रांवर बराच परिणाम झाला आहे.”
“म्हणून तुम्ही खादी वापरता वाटते? मी सुद्धा सूत काढते. मला गांधीजयंतीत पहिले बक्षीस मिळाले होते. आमच्या घरीहि खादी आहे.”
“दिसला खरी. तक्के, लोड खादीचे होते. खादीच्या शाली होत्या, तुमच्या वडिलांच्या अंगावरहि खादी होती.”
“परंतु बाबांचे तसे व्रत नाही.”
“आणि तुमचे?”
“माझेहि नाही. परंतु आपली खादी घएते. ही तुमची सारंगी. आम्हांला आज दाखवाल ना वाजवून?”
“दाखवीन रात्री जेवणानंतर.”
“छान होईल. बाबा सांगत असत आगगाडीतील ती मजा. तुम्हांला जागा नव्हती, तुम्ही सारंगी वाजवलीत; लोक या या करू लागले. मग तुम्ही बाबांच्या गादीवर बसलेत
“राजासारखा?”
“बाबा सांगत होते.”
“मी सहज झोपलो. ऐटीने किंवा उद्धटपणाने नाही.”
“असा नाही बाबांच्या म्हणण्याचा अर्थ. जणुं राजासारखे तुम्ही दिसत होता.”
“राजबिंडा जणुं!”
“हो राजबिंडे. तुम्हांला टेबल खुर्ची हवी का? मी देईन पाठवून. तुमच्या खओलीत लावायला आणखी काही हवें?”
“आणखी काही हवें? हरणें, मोरें?”
“तुम्ही कोठे पाहिलीत?”
“तुमच्या अभ्यासाच्या खोलीत.”
“माझ्या खओलीत गेले होतेत?”
“सहज बाहेरून पहात होतों.”
“आत का नाही गेलेत?”
“काही चोरायची इच्छा व्हायची!”
“तुम्ही चोर आहांत?”
“कलावान् चोर असतात. जगातले जे जे सुंदर दिसेल त्याचा त्याला संग्रह करावा असे वाटते.”