“कोणती?”
“अग, जगन्नाथचा तो दादा आपला वाडा घेऊ पहात आहे. फिर्याद करण्याचे त्यांचे विचार चालले आहेत. वाड्यावर जप्ती आणतील, घराचा ताबा घेतील, लिलाव पुकारतील. कानांवर आली खरी हकीगत.”
“त्यांना का थोडी घरे आहेत?”
“गरिबांचा अपमान करण्यातहि एक प्रकारचा आनंद असतो. कसे मोठमोठ्यांना मी खाली पहायला लावले, त्यांना घरातून बाहेर काढले, यातहि एक प्रकारचा पराक्रम काहींना वाटतो. परंतु आपला वाडा घेण्यांत त्यांची एक इच्छा आहे. या वाड्यांत धन पुरलेले आहे असे त्यांना म्हणे कोणी सांगितले. त्यामुळे हा वाडा घ्यावा असे त्यांना वाटत आहे; वाडा जुना झाला आहे. पुन्हा बांधायचा. त्या निमित्ताने खणावे, खोदावे लागेल. असले खरोखर ठेवणे तर मिळेल.”
“खरेच का जप्ती आणतील, लिलाव करतील?”
“अशी वदंता आहे. कानी आली आहे.”
“जगन्नाथला आपण सांगू.”
“तो काय करणार? थोबाडीत मारून त्याला गप्प बसवतील. व्यवहार आहे हा म्हणतील.”
“जगन्नाथ स्वत:च्या मित्राची का फजिती पाहील?”
“त्याच्या हाती का अद्याप व्यवहार आहे? आणि तेहि जरा मोठा झाला कीं असेच करील. प्रेमबीम सारे फोल आहे. गप्पा. प्रेमासाठी त्याग करणे कठीण आहे.”
“गुणाला खादीने नटवणारा जगन्नाथ त्याला कमी पडूं देणार नाही. तो मित्रांसाठी वाटेल ते करील.” अशी बोलणी चालली होती, तो गुणा आला. आईबापांचे गंभीर चेहरे पाहून तो तेथेच थबकला. त्याचे गुणगुणणे बंद झाले.
“काय ग आई?”
“तू ती खादी कशाला आणलीस? असली उसनी ऐट काय कामाची? आणि हे बोटात काय?”
“आंगठी. जगन्नाथ ऐकेना. त्याने माझ्या बोटात घातली. तो रडू लागला; मग मी काय करणार?”
“तू चोरलीस असेहि म्हणतील हो.”
“त्यांच्या घरी सर्वांना माहीत आहे. सर्वांच्या संमतीनेंच झालें.”