“मला नाही हो शंका. मी प्रेमाच्या स्वर्गात होतो. परंतु आता खाली आलो. स्वर्गातील गोष्टी का पृथ्वीवर दिसतात?”
“पृथ्वीवर स्वर्ग निर्मिणे हे तर प्रेमाचे काम. जेथे प्रेम आहे तेथे स्वर्ग आहे. जेथे प्रेम नाही तेथे नरक आहे, स्मशान आहे. मला प्रेमहीन जीवनाची कल्पनाच करवत नाही.”
“जगन्नाथ, प्रेमाची कसोटी काय?”
“प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीचे सतत चिंतन. त्या प्रिय व्यक्तीचे अंत:करणपूर्वक सतत स्मरण. त्या प्रिय व्यक्तीच्या मीलनाची इच्छा. त्या व्यक्तीच्या सुखदु:खाशी समरस होण्याची आतुरता.”
“प्रेम म्हणजे सर्वस्वत्याग.”
“हो.”
“तू माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करशील?”
“गुणा, काय सांगू? त्यागाच्या शाळेत मी कितपत पुढे जाईन ते सांगता येत नाही.”
“समज, या घरावर तुझ्या दादाने जप्ती आणली तर?”
“ते शक्य नाही.”
“आम्ही तुमचे देणेकरी आहोत. माझी मुंज तुझ्या घरी काढलेल्या कर्जाने झाली. गळ्याला कर्जाची दोरी व कमरेत मुंजीची दोरी. व्याज थकले. रक्कम जमली. आता पुढे जप्ती, लिलाव या गोष्टी येणारच.”
“मी ही गोष्ट होऊं देणार नाही. म्हणून तू रडत होतास? या घरांतून जावे लागेल, म्हणून तू दु:खी झाला होतास?”
“मनांत एकच भावना नव्हती. दु:खाच्या, प्रेमाच्या, अगतिकत्वाच्या संमिश्र भावना होत्या. आई बाबा म्हणत होते की, घरांतून बाहेर पडावे लागेल. त्यांना अपार वाईट वाटत होते. मलाहि दु:ख झाले.”