“आई, तुम्ही असें कां बोलतां? आम्हां मित्रांचें प्रेम तुम्हांला कोणालाच कसें समजत नाहीं?”
जगन्नाथचे डोळे भरून आले. गुणाची आई गहिंवरली.
“जगन्नाथ, तुझें मन मोठें आहे. परंतु जग खोटें आहे. गुणालाहि हे दागिने शोभतात हो. चांगला दिसतो हो तो.”
“माझ्यापेक्षां नाहीं दिसत चांगला?”
माझ्या आईच्या डोळ्यांना तो तुझ्याहूनहि चांगला दिसत आहे. दोघांवरून दृष्ट काठायला हवी. असेंच प्रेम मोठेपणीं दाखवा हो. लहानपणचे खेळ पुढें विसरूं नका. जगन्नाथ, गुणाचें कोणी नाहीं. आम्ही अशीं दरिद्री. तूंच त्याचा पुढें आधार हो.” असें म्हणून मातेनें डोळ्यांना पदर लावला.
“आम्ही मोठेपणीहि मित्र राहूं. एकमेकांना अंतर देणार नाहीं.” जगन्नाथ म्हणाला.
दोघे मित्र वर गेले.
“जगन्नाथ, गाणें म्हणू; मी वाजवतों.”
“म्हणूं गाणें? म्हणतों.”
जगन्नाथ, गाणें गाऊं लागला. गुणा सारंगी वाजवूं लागला. त्या दिवाणखान्यांत संगीताच्या लाटा उसळत होत्या. आणि मित्र-प्रेमाच्या लाटा त्यांत मिसळल्या होत्या. रामरावहि येऊन बसले. आईहि चूल सोडून वर आली. गाणें संपलें. वाद्य थांबलें.
“गुणा, जगन्नाथ, पुढें जीवनांत असेंच संगीत निर्माण करा. असेच एकरूप व्हा. एकमेकांस अंतर देऊं नका. गुणाला पुढें कोण, ही माझी चिंता आज दूर झाली. गुणाला दोन मित्र आहेत. एक जगन्नाथ व एक दी सारंगी. त्याला आतां कांहीं कमी पडणार नाहीं. नेहमीं विजयादशमी, सदैव आनंद.” रामराव म्हणाले.