“गुणा?”
“काय जगन्नाथ?”
“आम्ही श्रीमंत या बगळ्यांसारखेच. सावकार या बगळ्यासारखाच. गरिबांचे संसार पट्कन् गिळतो. एकदम त्यांवर झडप घालतो.”
“परंतु सारे श्रीमंत का तसे असतात?”
“अरे तसे न करतील तर ते श्रीमंत होणारच नाहीत. लुबाडल्याशिवाय का श्रीमंती येईल? श्रीमंत मनुष्य संपत्ति निर्माण करीत नाहीं. दुस-याच्या खिशांतील स्वत:च्या खिशांत घेतो. संपत्ति शेतकरी व कारखान्यांतील कामगार हेच निर्माण करतात. आम्ही ऐतखाऊ डुकरे.”
“जगन्नाथ, तू निराळ्या प्रकारचा हो.”
“परंतु मोठा होईन तेव्हा. स्वतंत्र होईन तेव्हा.”
“केव्हा होशील मोठा, केव्हा होशील स्वतंत्र?”
“आई बाबा आहेत तों थोडेच व्हायचे स्वतंत्र?”
“परंतु तुझी आईच तर म्हणत होती की लग्न झाले की करू स्वतंत्र याचा संसार.”
“आज ना उद्या केव्हा तरी होईनच मोकळा. दादाच्या पापापासून अलग होईन. जुने पाप धुऊन टाकीन.”
“जगन्नाथ, माझ्या घरावरहि जप्ती येईल का? फिर्याद झाली आहे.”
“फिर्याद झाली?”
“हो. आई रडत असते. बाबा सचिंत असतात.”
“परंतु मी जप्ती होऊं देणार नाही.”
“कोणता उपाय?”
“त्यांना सांगेन फिर्याद काढून घ्या. तुमच्याकडचे देणे माझ्या वाट्याला द्या असे सांगेन. मग ते बुडो, तगो.”
“ते हसतील. एकणार नाहीत.”
“मी उपवास करीन. धरणे धरीन. गुणा तू निश्चिंत रहा. मी माझ्या घराचा लिलाव होऊ देणार नाही. गावांत दवंडी पिटू देणार नाही.”