“गुणा, तू माझ्याकडे चल. माझा सदरा तुझ्या अंगांत घालतों. चल.”
“असें कसें करायचें?”
“मी तुझा मित्र नाही का?”
“तूं वेडा आहेस.”
“असू दे. चल माझ्याबरोबर. नाहीं तर मी येथें रडत बसेन.”
शेवटीं जगन्नाथ गुणाला घेऊन गेला. तो आपल्या खोलींत गुणाला घेऊन गेला. त्यानें गुणाच्या अंगांत एक रेशमी सदरा घातला. त्यानें आपलें एक सुंदर धोतर त्याला नेसायला दिलें. आपल्या बोटांतील एत आंगठी त्यानें त्याच्या बोटांत घातली. आणि गळ्यांतली कंठी त्याच्या गळ्यांत घातली. त्याच्या केसांना सुवासिक तेल त्यानें लाविलें. त्याचा त्यानें भांग पाडला. गुणा जणुं सौदर्यमूर्तिं दिसू लागला.
“गुणा, आतां आपण सारखे दिसतों नाहीं? माझ्या गळ्यांत गोफ, तुझ्या गळ्यांत कंठी. दोघांच्या बोटांत आंगठ्या. दोघांच्या अंगांत रेशमी सदरे. नेसूं जरीचीं धोतरें. आपण दोघे आता छान दिसतों नाहीं? तूं छान दिसतोस का मी? आपण त्या दिवाणखान्यांतील मोठ्या आरशांत जाऊन पाहूं ये. चल.”
आणि दोघे मित्र दिवाणखान्यांत गेले. आरशांत पाहूं लागले. एकमेकांकडे बघत व मंदमधुर हसत.
“गुणा, माझ्यापेक्षां तूंच चांगला दिसतोस.”
“जगन्नाथ, तूंच अधिक सुरेख दिसतोस.”
“आपण दोघे सुंदर आहोंत.”
“हो. दोघे छान आहोंत.”
इतक्यांत जगन्नाथाचा दादा तेथें आला.
“काय रे करतां? वा, आज गुणाहि सजून आला आहे वाटतें? गळ्यांत कंठी, नेसूं जरींचे धोतर! अरे वा, थाट आहे कीं! अद्याप घरांत दागदागिने आहेत वाटतें? परंतु सावरकाराला द्यायला मात्र काहीं नाहीं असें तर सांगतात.”
“ही कंठी कांहीं माझी नाहीं.”
“मग उसनी आणलीत वाटतें? गुणा, उसनी ऐट काय कामाची?”