“वेदांचा अर्थ नसता कळला म्हणून काय झालें असतें? हरिजनसंतांना का वेदांचा अर्थ माहित असणारे वेदांना भजूं लागले व वेदांचा अर्थ माहित असणारे वेदांना भजूं लागले व वेदांचा अर्थ माहीत नसणारे अद्वैत अनुभवूं लागले. तुमचे हे आचार्य, कोणाला आहेत त्यांची नावे माहीत ? तुम्ही वरचे लोक उगीचच प्रौढी मिरवीत असतां. कोट्यावधि लोकांना तुमच्या आचार्यांची आठवणसुद्धां नाही. आपल्या बिळांत बसून तुम्ही स्वत:ची पाठ थोपटून घेत असतां मला हसूं येतें.”
इतक्यांत तिकडून कोणी तरी त्या जंगलांतील लोक आले. जगन्नाथ व कावेरी बसली होतीं. जणुं स्वर्गातून खाली आलेलें जोडपें. ते रानटी लोक आले व यांच्या पायां पडले. त्यांनी कांही तरी विचारिलें. जगन्नाथला समजलें नाहीं. परंतु कावेरीला समजलें.
“हो, आम्ही या तळ्यांत पोहलों.” ती म्हणाली.
“पवित्र पाणी, फार पवित्र पाणी. जो पवित्र असेल तोच यांत तरतो. पापी या पाण्यांत बुडतो. पापाचें ओझे त्याला बुडवतें. हें पाणी फार हलकें आहे. निर्मळ आहे. निळे निळे पाणी. कृष्णाच्या अंगासारखें. रामाच्या अंगासारखें. गाईबैलांच्या डोळ्यांसारखे. या तळ्यांतील पाणी कोठून आलें माहित आहे का?”
कोठून आलें? या टेकडीवरून ना? नीलगिरीच्या टेकडीवरून आलेलें निळे पाणी.”
“नाही नाही. हें पाणी गोमातांच्या डोळ्यांतील आहे.”
गोमातांच्या डोळ्यांतील ?”
“हो. एकदां पृथ्वीवर फार अन्याय माजला होता. जिकडे तिकडे दु:ख, जिकडे तिकडे रडारड. गोमातांना ते दु:ख पाहावेना. सा-या जगांतील गोमाता येथे जमल्या व त्या रडल्या. त्यांच्या डोळ्यांतील पाण्याचें हे तळें बनलें प्रेमळ गोमातांच्या डोळ्यांतील करूणेचे पाणी. निळे निर्मळ पाणी. पुण्यवान पाणी. तुम्ही यांत पोहलांत. तुम्ही निर्मळ आहांत. देवमाणसें आहांत. जणुं रामसीता आहांत.”
“अरे राम सांवळा होता.”
“आणि सीता गोरी होती.”
“तुम्ही आज रंग बदलले असाल. राम गोरा झाला असेल. सीता सांवळी झाली असेल. त्या वेळच्या काळ्या रावणाला दूर करायला काळा राम होता. आजच्या रावणांना दूर करायला गोरा राम हवा.”
“गोरे रावण ?”
“कोठे आहेत ?”
“येथे सुद्धां आहेत. हे चहाचे मळे त्यांचे आहेत. चहाच्या वासानें हवा भरली आहे. आम्हां गरिबांचे त्या मळ्यांतून हाल. आम्ही त्या गाईप्रमाणें रडतो.”
“गाईंनी शिंगे उगारून आतां धावलें पाहिजे.”