“गाढवा, सणावारीं असें अशुभ बोलावें का? अलीकडे फार बोलायला शिकला आहेस. बोलशील असें पुन्हा, बोलशील?” असें म्हणून दादानें जगन्नाथाच्या दोन तीन थोबाडींत दिल्या. ते कोंवळे गाल लाल झाले.
“मार, ठार मार. नकोच मला हे दागिने, नको हा गोफ.” असें म्हणून जगन्नाथनें तो गोफ भिरकावला. तो आंगठ्याहि फेंकणार, परंतु दादानें दोन्ही हात पकडले व त्याला तो आणखीच मारूं लागला. जगन्नाथ रडूं लागला. गुणाहि रडूं लागला.
“त्याला नका मारूं, मला मारा. माझ्यामुळें हें सारें झालें. नका हो मारूं!” गुणा गयावया करून सांगत होता.
इतक्यांत खालून पंढरीशेट, जगन्नाथची आई वगैरे सारीं आलीं. दादा दूर झाला. आईनें जगन्नाथला जवळ घेतलें. तो मुसमुसत होता. त्याला राहून राहून रडें येत होतें. गालावर बोटें उठलीं होतीं.
“किती रे मारलेंस त्याला? मीं त्याला कधीं चापटसुद्धां मारली नाहीं.” आई म्हणाली.
“म्हणूनच असा फाजीलपणा करतों. तूं त्याला लाडावून ठेवला आहेस.”
“असे, पण सणावारीं का मारावें, बोलावें? आज दस-याचा दिवस. आम्ही अजून जिवंत आहोंत तों त्याला असें छळतां, मग आमच्या पाठींमागें त्याचें काय कराल?”
“आई, तुला तो चांगला दिसतो, चांगला वाटतो. परंतु त्याला काडीची अक्कल नाहीं. तो उद्यां घरांतील सारें वांटून देईल. सर्वांना भिकेला लावील. त्या दिवशीं म्हणाला कीं काडी लावीन त्या जमाखर्चाच्या वह्यांना आणि आज गळ्यांतील गोफ, बोटांतील आंगठ्या भिरकावून द्यायला लागला. हा गोफ बाहेरच जायचा, परंतु खिडकीच्या फळीला लागून आंत पडला. आणि मी दोन्ही हात धरून ठेवले म्हणून ह्या आंगठ्या राहिल्या आणि म्हणे गुणाला हे माझे दागिने मीं दिले. उद्यां लहान इंदु, मनी यांच्या अंगावरचेहि दागिने काढून हा द्यायचा कोणाला! वाटेल तें करतो, वाटेल तें बोलतो. म्हणे मला भिकारी व्हावयाचें आहे. आज विजयादशमी, असें बोलावें का?”
“आई, ही कंठी, हा गोफ, ह्या आंगठ्या हें सारें माझें म्हणून ना तुम्हीं माझ्या अंगावर घातलें? होय ना?”
“मग माझे आहेत म्हणून मीं गुणाला दिले. पुढच्या सणावारीं उरतील तेवढेच मला घालायला द्या. जें माझें असेल तें आम्ही दोघे घेतों. गुणा व मी. मी माझ्या खाऊंतील खाऊ गुणाला देतों. गुणाला दिल्याशिवाय मी कांहीं खात नाहीं.”